पुणे – टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेच्या संयोजकां तर्फे या एटीपी 250 टेनिस या स्पर्धेचे आगामी 2020 मध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आयोजन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेची दुसरी मालिका 31 डिसेंबर 2018 ते 5 जानेवारी 2019 या कालावधीत पार पडली. एटीपी कॅलेंडरमधील स्पर्धांपैकी हि या मौसमातील पुण्यातील सुरुवातीची स्पर्धा असून यामध्ये केविन अँडरसन, मरिन चिलीच, हियोन चूँग, जाईल्स सिमॉन, मालेक झजेरी, इव्हो कार्लोविच हे अव्वल मानांकित खेळाडू या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवितात.
टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार म्हणाले की, 2020 पासून एटीपी करंडक स्पर्धेच्या समावेशमुळे 2020 टेनिस मौसम अतिशय व्यस्त होणार आहे. त्यामुळे एटीपी आम्हांला पाचव्या आठवड्यात स्पर्धा घेण्याची सूचना केली आणि आम्ही अत्यंत आनंदाने हा प्रस्ताव मान्य केला.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेचा एक संयोजक या नात्याने हि स्पर्धा एटीपी कॅलेंडरमधील एक महत्वाची स्पर्धा असल्याचा आम्हांला आनंद होत आहे. या नव्या वेळापत्रकाप्रमाणे हि स्पर्धा होणार असून आधीच्या दोन मालिकांमधील सहा दिवसांऐवजी हि स्पर्धा पूर्ण आठवडाभर होणार आहे.