टाटा जलविद्युत प्रकल्पाचे पाणी वळविणार?

पिण्यासाठी तसेच शेतीसाठी जादा पाणी उपलब्ध होणार

पुणे – टाटा जलविद्युत प्रकल्पासाठी मागील 90 वर्षांपासून जिल्ह्यातील मुळशी व इतर धरणांमधून दरवर्षी सुमारे 42.50 टीएमसी पाणी पश्‍चिमेकडे वळविण्यात येऊन वीजनिर्मितीसाठी वापरले जाते. हे पाणी भीमा या तुटीचे खोऱ्यातील असून यातील बहुतांश भाग दुष्काळग्रस्त आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरणामुळे पाण्याच्या मागणीत वाढ झालेली आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे पाण्याचे प्रमाण टप्प्याटप्याने कमी करून ते पाणी पुन्हा पूर्वेकडे वळविण्याच्या उपाययोजनांसाठी शासनाने 9 जणांची समिती नेमली आहे. ही समिती तीन महिन्यांत अहवाल सादर करणार आहे. या समितीच्या नियुक्तीमुळे पुणेकरांना पिण्यासाठी, उद्योग आणि सिंचनासाठी जादा पाणी मिळू शकते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरवर्षी कोयना जलविद्युत प्रकल्पाद्वारे 67.50 टीएमसी व टाटा जलविद्युत प्रकल्पाद्वारे 42.50 टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले जाते. जिल्ह्यातील मुळशी व इतर धरणांतून वीजनिर्मितीसाठी वापरले जाणारे 42.50 टीएमसी इतके पाणी कोकणात जाते. त्या पाण्याचा उपयोग जिल्ह्यातील दुष्काळी भागांना होत नाही. कृष्णा पाणी तंटा लवादाने प्रति जलवर्षासाठी खोऱ्याबाहेर पाणी वळविण्यासाठी सरासरी व अधिकची मर्यादा ठरवून दिली आहे. राज्य जलनितीनुसार पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आहे. त्यानंतर सिंचनासाठी पाणी असा पाणी वापरण्याचा क्रम ठरला आहे. तसेच विविध पर्यायांद्वारे वीज उपलब्ध करणे व शक्‍य असल्याने पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता वीजनिर्मितीसाठीचे पाणी वळविण्याच्या आवश्‍यकतेबाबत फेरअभ्यास करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

असा असेल समितीचा अभ्यास
ही समिती कोयना जलविद्युत प्रकल्प व टाटा जलविद्युत प्रकल्प समुहातून वीजनिर्मितीसाठी कोकण भागात वळविण्यात येणारे पाणी टप्प्याटप्याने कमी करण्याबाबत अभ्यास करणार आहे. वीजनिर्मितीसाठी सध्याची निर्माण केलेली व्यवस्था अधिक कार्यक्षमतेने उपयोगात आणण्यासाठी उपाययोजना सुचविणार आहे. जेणेकरून कमी पाण्याचा वापर होऊन वीजनिर्मिती करणे शक्‍य होईल. जलविद्युत निर्मितीनंतर सोडण्यात येणारे पाणी कोकणात सिंचन, पिण्यासाठी व औद्योगिक कारणासाठी करण्यात येतो. अशा परिस्थितीत पाणी बंद केल्यास हा भागासाठी पाणी उपलब्ध होणार नाही. याअनुषंगाने सध्या वापरात येणाऱ्या पाण्यासाठी कोकणातील जलस्रोतांचा विकास करण्यासाठी उपाययोजना सुचविणे. या प्रस्तावामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य कायदेविषयक बाबींचा परामर्श घेऊन त्यावर पुढील दिशा ठरविणे हे काम ही समिती करणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)