बॉलीवूडमधील युवा अभिनेत्री तारा सुतारियाने करण जोहरच्या “स्टूडेंट ऑफ द इयर’मधून चित्रपटसृष्टीत यशस्वीपणे पर्दापण केले. या चित्रपटातील तिच्या अभिनयाची सर्वांनीच स्तूती केली होती. तसेच यंगस्टर्समध्येही तिला खूपच प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटाच्या यशानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्सही आल्या.
सध्या तारा ही मिलाप झावेरी यांच्या आगामी “मरजावां’ चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख यांच्यासोबत काम करत आहे. याशिवाय ताराने साजिद नादियाडवाला यांच्या “आरएक्स 100’चा रिमेकही साईन केला आहे. त्यानंतर आता तारा सुतारिया ही अनीस बझ्मी यांच्या आगामी “आंखे-2’मध्ये झळकण्याची शक्यता आहे.
या चित्रपटासाठी ताराने नुकतीच अनीस यांची भेट घेतली आहे. याप्रसंगी तारासोबत तिचा बिझनेस मॅनेजरही होता. दुसरीकडे बझ्मी यांनीही काही अभिनेत्यांची भेट घेतली आहे. अनीस बझ्मी हे लवकरच “आंखे-2’चे शुटिंग सुरु करणार असून चित्रपटासाठी अनेक स्टारकास्टची नावे चर्चेत आहेत.
दरम्यान, चित्रपट निर्मात्यांनी यापूर्वी जॅकलीन फर्नांडिस, सैफ अली खान, सनी देओल आणि विकी कौशल यासारख्या दिग्गज कलाकारांशी चर्चा केली आहे. आता या मल्टी स्टारर चित्रपटात तारा सुतारियाची वर्णी लागते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. हा चित्रपट सुपरहिट ठरलेल्या “आंखे’चा सिक्वल आहे, ज्यात अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, परेश रावल, अर्जुन रामपाल आणि सुष्मिता सेन यांनी मूख्य भूमिका साकारल्या होत्या.