टँकर माफियांना ‘पवना पावली’

चोरीच्या पाण्यावर लाखो रुपये कमवतात
दुष्काळाची छाया; धनदांडग्यांना “माया’

चोरीच्या पाण्यातून कमाई : पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष
दररोज शंभर टॅंकर पाण्याची होतेय चोरी

बहुतेकांनी टॅंकर खरेदी करून सुरू केला व्यवसाय

पाणीचोरीबाबत स्थानिकांची चुप्पी…

एकीकडे राज्यात दुष्काळाच्या छायेत लोटला असताना पवना नदीपात्रातून दररोज हजारो लीटर पाण्याची चोरी केली असल्याचे दिसून येत आहे. मावळ तालुक्‍यातील पवना काठच्या गावांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. दुष्काळीजन्य स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर पवना धरणातून नदीत पाण्याचे आवर्तन सोडण्यात येते, त्यामुळे नदीपात्रात बारमाही पाणी असते. नदीपात्रातून पाणीचोरी होऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणा खबरदारी घेण्याच्या सूचना दिलेल्या असतानाही राजरोस पाणीचोरी होत आहे. तालुक्‍यात दुष्काळी स्थिती असताना टॅंकर माफियांकडून पाणी चोरीतून “माया’ गोळा केली जात आहे. नदीपात्रातून पाणी चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जागरूक नागरिक करीत आहे.


पवनानगर – राज्यात दुष्काळीसदृश्‍य स्थिती असताना मावळ तालुक्‍यातील काठावरील अनेक गावांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. मावळसह पिंपरी-चिंचवड शहराची “जीवनवाहिनी’ म्हणून संबोधणाऱ्या पवना नदीतून काही टॅंकर माफियांनी सध्या पाणी चोरीचा धंदा राजरोस सुरू केला आहे. पाणीचोरीवर पाटबंधारे विभागाचा “वॉच’ असला तरी धरण प्रशासनाची जुजबी कारवाई झुगारून “पाणीचोर’ मिळेल, त्याठिकाणाहून पाणी उचलून “माया’ गोळा करीत आहेत. नदीपात्रातून दररोज सुमारे शंभर टॅंकर अथवा अन्य वाहनांमधून पाणी पळविले जाते, यासाठी पाटबंधारे विभागाकडून ठोस “बंदोबस्त’ करण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे.

पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासाठी दररोज पवना नदीतून पाण्याचा विसर्ग केला जातो; परंतु पाणी माफिया याच पाण्यावर डल्ला मारतात. पवनानगर परिसरात बहुतेक धनदांडग्यांनी महागाव, आंबेगाव, शिंदेगाव, दुधिवरे, तिकोणा, जवण, ठाकुरसाई, गेव्हंडे या परिसरात बंगले उभारले आहेत. तर काहींचे बांधकाम सुरू आहेत, यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज भासत असते. त्यामुळे कमी पैशात अधिक पाणी मिळविण्यासाठी अनेक खासगी “फार्म हाऊस’ वाल्यांनी टॅंकर घेतले आहे.

ब्राम्हणोली येथील पवनानदीतून दररोज 100 टॅंकर आणि अन्य वाहनातून पाणी चोरी केली जाते. पाणी वाहतुकीचा व्यवसाय तेजीत चालण्यासाठी अनेकांनी टॅंकर खरेदी करून हा व्यवसाय थाटला आहे. सध्या लोणावळा-पौड रस्त्यावर पाणी मारण्यासाठी हेच पाणी टॅंकरधारक रस्त्याच्या ठेकेदारांना विकत आहे. त्याच चोरीच्या पाण्यावर व्यावसायिक लाखो रुपये कमवतात. याबाबत पाटबंधारे विभागाकडे अनेकदा नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत; परंतु पाटबंधारे विभागाचे अधिकारी “अर्थपूर्ण’ व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे निदर्शनास येत आहे. याशिवाय काही काळ कारवाई केली जाते, त्यानंतर पुन्हा टॅंकरमधून पाणी उपसा केला जात आहे.

एकीकडे ग्रामीण भागात पाण्याची बिले भरण्याबाबत नागरिक उदासीन दिसतात. टॅंकर माफियांमध्ये धनदांडगे असल्यामुळे स्थानिक नागरिक यांच्याविरोधात बोलण्यास धजावत नाही. यामुळे पाणीचोर समोर असतानाही त्यांच्यावर कायद्याचे कोणतेही बंधन नसल्यामुळे ब्राह्मणोली गावातून नदीपात्रातून टॅंकरद्वारे पाणीचोरी उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय अधिकाऱ्यांसमोर पर्याय उरलेला नाही. पाणीचोरांवर ठोस कारवाईसाठी पाटबंधारे विभागाच्या कारवाईत ठोस बदल अपेक्षित असल्याचे मत व्यक्‍त होत आहे. आता पाटबंधारे विभागाकडून पाणी चोरीच्या ठिकाण बंद केले असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात हे कितीदिवस राहिल, हे सांगता येत नाही.

पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्र परिसरातील अनेक गावांना दुष्काळसदृश्‍य स्थिती निर्माण झाली आहे. त्याभागातील काही नागरिक नदीपात्रातून पाणी उचलत होते. पवना नदीतून विनापरवाना पाण्याचे टॅंकर भरले जात होते. ही बेकायदेशीर “पाणी पळवा पळवी’ तात्काळ थांबविण्यात आली आहे. आता ग्रामपंचायत पाणी योजनांनी पाणी उचलण्याची परवानगी घेतली आहे. त्याठिकाणाहून पाणी दिले जाईल. आता यापुढे पाणी भरण्यास येणाऱ्या अनधिकृत टॅंकर मालकांची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल.

– अशोक शेटे, उपअभियंता, पाटबंधारे विभाग.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)