मतदानात तामिळनाडू अव्वल

लोकसभा निवडणुकांचा ज्वर आता चढू लागला आहे. काही आठवड्यांपूर्वीपर्यंत महाराष्ट्रात दुरंगी लढती होतात की काय असे वाटू लागलेले असताना आता समोर आलेल्या चित्रानुसार बहुतेक सर्वच मतदारसंघात चौरंगी-पंचरंगी लढती होणार आहेत. पण वाचकहो, लोकसभेच्या जागांवर उमेदवार उभे राहण्याचा देशभरातील इतिहास पाहिला तर यामध्ये तमिळनाडू हे राज्य यामध्ये अव्वल असल्याचे दिसून येईल. तमिळनाडूने याबाबतीत

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशला मागे टाकलेले आहे. अर्थात, या दोन राज्यांत लोकसभेच्या जागा जास्त आहेत; पण तरीही टक्‍केवारीचा विचार करता तमिळनाडूने आघाडी घेतली आहे.

तमिळनाडूत 2014 मध्ये 39 जागांवर 845 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. उत्तर प्रदेशातील 80 जागांसाठी 1288 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. महाराष्ट्रात गत निवडणुकांमध्ये लोकसभेच्या 48 जागांसाठी तब्बल 893 उमेदवार रिंगणात उतरले होते. याचाच अर्थ तमिळनाडूत एका जागेवर सरासरी 21 उमेदवार उभे होते, तर उत्तर प्रदेशात 21 आणि महाराष्ट्रात 18 उमेदवार होते. गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये एका जागेवर सर्वाधिक उमेदवार उभे असण्याचा “मान’ही तामिळनाडू राज्याकडेच आहे. येथील चेन्नई दक्षिण लोकसभा मतदारसंघात 2014 च्या निवडणुकीत 42 उमेदवार उभे होते. तर 2009 मध्ये 43 आणि 2004 मध्ये 35 उमेदवार रिंगणात उतरले होते.

हे राज्य अन्यही एका बाबतीत अव्वल आहे, ते म्हणजे सरासरी मतदान. तमिळनाडूमध्ये मतदारांचा उत्साहही अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसते. 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये या राज्यात सरासरी 73.74 टक्‍के मतदान झाले होते. 2009 मध्ये ते 73.5 आणि 2004 मध्ये 60.81 टक्‍के होते. महाराष्ट्रात 2014 मध्ये 60.32 टक्‍के सरासरी मतदान झाले होते. देशातील सर्वांत मोठे राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशात मतदान जागृती अभियान राबवूनही तेथे गतवेळी 58.44 टक्‍के मतदानच झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)