पुणे – वृक्ष लागवडीसाठी तालुकास्तरीय समिती

नागरिकांपर्यंत मोहीम पोहोचवण्यासाठी होणार मदत

पुणे -“वृक्ष लागवडीची मोहीम तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचावी, यासाठी तालुकास्तरावर समिती करण्याची मागणी विविध विभागांकडून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केली होती. या मागणीला वनमंत्र्यांकडून परवानगी देण्यात आली असून यांतर्गत 358 तालुकास्तरीय समित्यांची स्थापना होणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

वनविभागातर्फे आयोजित वनमहोत्सव या उपक्रमासाठी पुणे विभागाच्या तयारीची आढावा बैठक मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सोमवारी झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीसाठी आमदार विजय शिवतारे, सदाभाऊ खोत, वन सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्‍त दीपक म्हैसेकर हे उपस्थित होते. यंदा या उपक्रमासाठी 33 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून पुणे विभागाला सुमारे 5 कोटी 47 लाख 51 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यंदा या महोत्सवात नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी तालुकास्तरावर समिती नेमल्यास त्याचा फायदा होईल, अशी सूचना अधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती.

या सूचनेला मान्यता देत, मुनगंटीवार यांनी लवकरच याबाबतचा अध्यादेश काढणार असल्याचे सांगितले. यांतर्गत 358 तालुकास्तरीय समित्यांची स्थापना होणार असून याबाबतचा अध्यादेश जाहीर होईल. या समित्या विधानसभानिहाय असतील. तसेच, स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली याची स्थापना होणार आहे. या समित्यांमार्फत वृक्षारोपण उपक्रमात जास्तीत जास्त लोकसहभाग वाढविणे आणि वृक्षारोपणाची योग्य ती देखरेख करण्याचे काम केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

पाण्याच्या सोयीबाबत माहिती नाही
वृक्षारोपण केल्यानंतर झाडांची योग्य वाढ होणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. मात्र, यंदा कमी पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत वृक्षारोपण कायम ठेवण्यासाठी पाणी व्यवस्थेबाबत काय उपाययोजना केल्या आहेत? असा प्रश्‍न विचारला असता, परिस्थिती गंभीर आहे. “झाडांसाठी पाणी नाही, पाण्यामुळे झाड नाही’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच वृक्षारोपण आवश्‍यक आहे’ असे सांगत मुनगंटीवार यांनी मुळ प्रश्‍नाचे उत्तर देणे टाळले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)