गावांचा बदलता चेहरा भाग-5 (तळवडे) : सुविधांसाठी “रेडझोन’ अडथळा

गणेशनगर, तळवडे - रस्त्याचे डांबरीकरण रखडले आहे.

तळवडेत आवश्‍यकतेनुसार नागरी सुविधांची पूर्तता

पिंपरी – लघुउद्योगांबरोबर आयटी पार्कमुळे प्रकाशझोतात आलेल्या तळवडेमध्ये गेल्या 22 वर्षात आवश्‍यकतेनुसार रस्ते, वीज, पाणी, शाळा, दवाखाना आदी सुविधा नागरिकांना मिळाल्या आहेत. तुलनेत आरक्षणांचा रखडलेला विकास, लोकसंख्या वाढ आणि उद्योग-व्यवसायांचे विस्तारलेले जाळे यामुळे मूलभूत सुविधांची मागणी वाढली आहे.

-काय हव्यात सुविधा

1.परिसराला पुरेशा दाबाने पाणीपुरवठा आवश्‍यक
2.अंतर्गत आणि प्रमुख रस्त्यांची व्हावी तातडीने दुरुस्ती
3.भाजी मंडई, खेळाचे मैदान, जलतरण तलाव, उद्यान

तळवडेतील बराच भाग रेडझोन हद्दीत येत असल्याने ही मागणी पुरविताना महापालिका प्रशासनाची मात्र चांगलीच दमछाक होत आहे. तळवडे भागाचा गेल्या 22 वर्षात बराच कायापालट झाला. परिसरात लघुउद्योगांचे जाळे विस्तारले. त्याच बरोबरीने तळवडे आयटी पार्क विकसित झाला. तळवडे परिसरात प्रामुख्याने तळवडे गावठाण, गणेशनगर, त्रिवेणीनगर, सहयोगनगर, रूपीनगर, ज्योतिबानगर आदी भागाचा समावेश होतो. तळवडे गावात प्रत्यक्ष फेरफटका मारून नागरिकांच्या अपेक्षा तसेच, गावातील सुविधांची सद्य:स्थिती जाणून घेतली. त्रिवेणीनगर ते तळवडे या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.

लघुउद्योगांजवळ (वर्कशॉप) जाण्यासाठी असलेले अंतर्गत रस्ते हे खडकाळ आहेत. महापालिकेचा दवाखाना आहे. तेथे महिलांसाठी प्रसूतिगृह, रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्याची सोय नाही. त्यामुळे रुग्णांना पुढील उपचारासाठी आकुर्डी, यमुनानगर येथील पालिका रुग्णालयात जावे लागते. शाळा दहावीपर्यंत सुरू करणे आवश्‍यक आहे. निगडी-देहू, देहू-आळंदी या बस तळवडे येथून जातात. पुण्याला जाण्यासाठी थेट बस सुरू व्हायला हवी. माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश चव्हाण व किसन चव्हाण यांनी समस्या मांडल्या.

“रेडझोन हद्द येत असल्याने नवीन विकासकामांना अडचणी येत आहेत. सध्या 50 टक्के विकासकामे मार्गी लागलेली आहेत. मलनिस्सारण नलिका, जलवाहिन्या टाकण्याची कामे झाली आहेत. पाणीपुरवठ्याचा 75 टक्के प्रश्‍न मार्गी लागला आहे. लघुउद्योगांच्या परिसरात पक्के रस्ते करण्याचे काम बाकी आहे. चोवीस तास पाणीपुरवठ्यासाठी नळजोड घेण्याचे काम सुरू आहे.
– संगीता ताम्हाणे, नगरसेविका

आरक्षणांचा रखडला विकास

तळवडे परिसरात 79.59 हेक्‍टर इतक्‍या क्षेत्रावर विकासकामांसाठी 75 आरक्षणे टाकली आहेत. प्रत्यक्षात त्यातील 1.60 हेक्‍टर इतक्‍याच जागेचा ताबा महापालिकेला मिळाला आहे. त्यामुळे आरक्षणांचा अपेक्षित विकास होऊ शकलेला नाही. प्राथमिक शाळा, उद्यान, खेळाचे मैदान, कम्युनिटी सेंटर व ग्रंथालय, व्यापारी संकुल, दवाखाना व प्रसुतिगृह, जलतरण तलाव, बसथांबा आदी सुविधांसाठी आरक्षणे टाकलेली आहेत.

“रेडझोनमुळे विकासकामे करण्यात अडथळे येत आहेत. आरक्षित जागांचा विकास प्रलंबित आहे. खेळाचे मैदान, भाजी मंडई, जलतरण तलाव आदी सुविधा व्हायला हव्या. पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे. देहू-आळंदी रस्त्यावर खुप मोठ्या प्रमाणात अवजड वाहने थांबतात. त्यामुळे वाहतुक कोंडी होते. डिअर सफारी पार्कचा विषय मार्गी लावणे आवश्‍यक आहे.
– शांताराम भालेकर, माजी नगरसेवक

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)