रस्त्याचे काम अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा

संतप्त विरमाडे ग्रामस्थांची मागणी
निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा

सातारा- विरमाडे, ता. वाई येथील महामार्गापासून गावापर्यंतच्या एक किलोमीटरच्या रस्त्याचे काम गावातील पुढारी आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे सुरु झाले. या कामाचा ठेका माजी सभापतीच्या भावाला मिळाला असून त्याच्याकडून हे काम अत्यंत दर्जाहिन पद्धतीने सुरु असल्याने ग्रामस्थांनी हे काम रोखले आणि दर्जेदार कामाची मागणी केली. त्यामुळे ठेकेदाराचे लाखो रुपये हडपण्याचे मनसुबे सूज्ञ नागरिकांमुळे धुळीस मिळाल्याने गत पंधरा दिवसांहून अधिक कालावधी झाल्यानंतरही संबंधित ठेकेदाराने कामाला सुरुवात केली नसल्याने रस्त्याने चालणेही मुश्‍लिक झाले आहे. त्यातच ठेकेदाराने डांबराचा वापर न करताच मोठी खडी रस्त्यावर अंथरल्याने किरकोळ अपघातांची मालिकाही सुरु झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे काम सुरु न झाल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

दहा वर्षांपासून विरमाडे रस्त्याची दुरुस्ती झाली नसल्याने या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. रस्त्यावर दोन-अडीच फुटाचे मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करताना वाहनधारकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत होता. ग्रामस्थांची ही अडचण ओळखून गावातील पुढारी तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने आमदार मकरंद पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनीही या एक किलोमीटरच्या खडीकरण तसेच डांबरीकरणाच्या कामासाठी सुमारे 23 लाखाचा निधी उपलब्ध करुन दिला.

रस्त्याच्या कामाच्या उद्‌घाटनाचा नारळही फुटला आणि कामालाही सुरुवात झाली. मात्र, संबंधित काम हे एका माजी सभापतीच्या भावालाच मिळाले. त्याने सुरुवातीपासूनच काम दर्जाहिन करण्यास सुरुवात केली. याबाबत ग्रामस्थांकडून ठेकेदाराला वारंवार सूचना देण्यात येत होत्या. मात्र तरीही ग्रामस्थांच्या सूचनांना कोलदांडा दाखवत या ठेकेदाराने डांबर न टाकताच रस्त्यावर मोठी खडी अंथरली आणि त्यावरुन रोलर फिरविला. लगेच दुसऱ्या दिवशी झारीच्या सहाय्याने अत्यल्प डांबराचा वापर करत बारीक खडी टाकून रोलर फिरविला.

त्यामुळे वारंवार सांगूनही ठेकेदाराकडून दर्जाहिन काम सुरु असल्याने संतप्त ग्रामस्थांनी कामच थांबविलेद्या घटनेला आता पंधरा दिवसांहून अधिक कालावधी उलटून गेला असतानाही संबंधित ठेकेदाराने काम सुरु केले नसल्याने सध्या या रस्त्याने चालणेही कठीण झाले आहे. तसेच दुचाकीस्वारांचे किरकोळ अपघातही घडत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर काम सुुरु न झाल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा आता विरमाडे ग्रामस्थ घेऊ लागले आहेत.

काम दर्जेदारच होईल : आ. पाटील
विरमाडे रस्त्याच्या दर्जाहिन कामाबाबत आमदार मकरंद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता. संबंधित ठेकेदाची चौकशी करुन रस्त्याचे काम दर्जेदारच करुन देऊ असे आश्‍वासन आमदार मकरंद पाटील यांनी दिले आहे.

म्हणे “ठेकेदाराविरुद्ध तक्रार देता येत नाही’
अर्धवट ठेवलेल्या रस्त्याच्या कामासंदर्भात नुकतीच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामसेविका यांच्यामध्ये बैठक पार पडली. यावेळी संबंधित ठेकेदाराविरोधात तक्रार केली जावी, असा सूर काही सदस्यांमधून उमटला. मात्र, ठेकेदाराविरोधात तशी तक्रार देता येत नाही’ असा जावईशोध काही जबाबदार पदाधिकाऱ्यांनी लावला आणि संबंधित तक्रारदारांची एक प्रकारे दिशाभूलच केली असल्याची माहिती एका ग्रामपंचायत सदस्यानेच दिली आहे.

मुजोर ठेकेदाराला काळ्या यादीत टाका
वारंवार सूचना देऊनही दर्जाहिन काम करण्याचे धाडस या ठेकेदारात आलेच कुठून? असा संतप्त सवाल नागरिकांमधून होत असतानाच या मुजोर ठेकेदारावर जिल्हा प्रशासनाने कारवाई करुन काळ्या यादीत टाकावे. तसेच संबंधित ठेकेदाराने याआधी केलेल्या कामांचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी विरमाडे ग्रामस्थांमधून होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)