नगर: विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे नगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार व त्यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांचा प्रचार करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर काही कारवाई करणार की नाही? असा प्रश्न राष्ट्रवादीने कॉंग्रेसने केला आहे. तसेच पत्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांना देण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांनी तसे पत्र खा.चव्हाण यांना दिले आहे.
या पत्रात काकडे यांनी म्हटले आहे की, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार म्हणून संग्राम जगताप निवडणूक लढत आहेत. तर त्यांच्या विरोधात युतीचे डॉ. सुजय विखे रिंगणात आहेत. डॉ. विखे हे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव आहेत. ना. विखे हे माध्यमासमोर उघड उघडपणे तेथे युतीचा उमेदवार निवडून येईल, असे सांगतात. तसेच या मतदारसंघात डॉ. विखे यांचा प्रचार करीत आहेत. हे अतिशय गंभीर आहे. ना. विखे यांच्या या भूमिकेमुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमात आहे. आपण काही कारवाई करणार आहात की नाही. असा सवाल करण्यात आला आहे. खा. चव्हाण यांनी या पत्राचा विचार करून विखेंवर कारवाई करावी अशी मागणी काकडे यांनी केली आहे.