टेबल टेनिस स्पर्धा : स्वप्नाली नरळे, आर्यन पानसे ज्युनियर गटांत विजेते

प्लेअर्स चषक जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा

पुणे: अग्रमानांकित स्वप्नाली नरळे आणि 11वा मानांकित आर्यन पानसे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर परस्परविरुद्ध शैलीत विजयांची नोंद करताना येथे सुरू असलेल्या प्लेअर्स चषक जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील अनुक्रमे ज्युनियर मुली व ज्युनियर मुलांच्या एकेरीत विजेतेपदाचा मान मिळविला. माजी खेळाडूंनी आयोजित केलेली ही स्पर्धा डेक्‍कन जिमखाना टेबल टेनिस संकुलात सुरू आहे.

-Ads-

अकराव्या मानांकित आर्यन पानसेने अंतिम सामन्यात अग्रमानांकित आरुश गलपल्लीवर 11-4, 11-5, 11-3, 9-11, 4-11, 11-8 अशी रोमांचकारी मात करताना ज्युनियर मुलांच्या एकेरीत विजेतेपद पटकावले. आर्यनने अग्रमानांकित आरुश गलपल्लीला चकित करताना स्पर्धेतील सर्वाधिक खळबळजनक निकालाचीही नोंद केली.

आर्यनने त्याआधी उपान्त्य लढतीत द्वितीय मानांकित श्रीयांश भोसलेचा प्रतिकार 11-5, 11-8, 11-7, 11-9 असा संपुष्टात आणताना सनसनाटी विजयासह अंतिम फेरीत धडक मारली होती. तसेच अग्रमानांकित आरुशने उपान्त्य फेरीच्या लढतीत सबज्युनियर विजेत्या व चतुर्थ मानांकित अनेय कोवेलामुडीचे आव्हान 11-6, 9-11, 15-13, 11-8, 11-6 असे मोडून काढत अंतिम फेरी गाठली होती.

ज्युनियर मुलींच्या अंतिम लढतीत अग्रमानांकित स्वप्नाली नरळेने द्वितीय मानांकित मृण्मयी रायखेलकरचा प्रखर प्रतिकार 11-8, 10-12, 11-7, 11-4, 10-12, 11-6 असा मोडून काढताना विजेतेपदाची निश्‍चिती केली. स्वप्नालीने त्याआधी उपान्त्य फेरीत पाचव्या मानांकित अंकिता पटवर्धनची झुंज 11-7, 7-11, 11-7, 11-9, 11-8 अशी संपुष्टात आणताना अंतिम फेरी गाठली होती. तर मृण्मयीने उपान्त्य लढतीत सहाव्या मानांकित पूजा जोरावरला 11-3, 11-7, 8-11, 11-6, 11-6 असे पराभूत करीत अंतिम फेरीत स्थान मिळविले होते.

सनत-वैभव पुरुषांची अंतिम लढत

अग्रमानांकित सनत बोकील व द्वितीय मानांकित वैभव दहीभाते यांच्यात पुरुष एकेरीची अंतिम लढत रंगणार आहे. अग्रमानांकित सनतने उपान्त्य लढतीत नवव्या मानांकित तनय शिंदेचा 11-4, 11-7, 11-9, 11-6 असा सरळ गेममध्ये पराभ” करीत अंतिम फेरीत धडक मारली. तर वैभवने दुसऱ्या उपान्त्य लढतीत तृतीय मानांकित ऋषभ सावंतवर 11-8, 11-6, 11-7, 6-11, 11-9 असा विजय मिळवीत अंतिम फेरी गाठली होती. प्रौढांच्या विजेतेपदासाठी तृतीय मानांकित नितीन मेहेंदळेसमोर पाचव्या मानांकित अजय कोठावळेचे आव्हान आहे. पहिल्या उपान्त्य लढतीत नितीनने द्वितीय मानांकित शेखर काळेचा 16-14, 11-8, 11-3 असा एकतर्फी पराभव केला. तर दुसऱ्या उपान्त्य सामन्यात अजयने अग्रमानांकित दीपेश अब्यंकरला 11-7, 11-9, 10-12, 11-8 असे चकित करीत अंतिम फेरीत स्थान मिळविले. दरम्यान इआठवा मानांकित ईशान कांडेकर, नववा मानांकित शौरेन सोमण, चतुर्थ मानांकित रामानुज जाधव व द्वितीय मानांकित अभिराज सकपाळ यांनी मिडजेट मुलांच्या एकेरीत उपान्त्य फेरीत धडक मारली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)