आदर्श ओम छेत्री, सुहाना सैनी, इमॉन अधिकारी, सयानी पांडा यांना विजेतेपद

6 वी सुदेश शेलार मेमोरियल करंडक टेबल टेनिस स्पर्धा

पुणे – सुदेश शेलार मेमोरियल फाऊंडेशन व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने व टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 6व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक-11स्पोर्टस राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत सब जुनियर मुलांच्या गटात आदर्श ओम छेत्री तर मुलींच्या गटात सुहाना सैनी यांनी आणि कॅडेट मुलांच्या गटात इमॉन अधिकारी तर मुलींच्या गटात सयानी पांडा यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले.

-Ads-

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत विजेतेपदासाठीच्या सब जुनियर मुलांच्या गटात संघर्षपुर्ण लढतीत दिल्लीच्या आदर्श ओम छेत्रीने तामिळनाडूच्या विश्वा दिनदयालन याचा 4-3(13-11, 10+12, 11-4, 11-8, 6-11, 6-11, 11-4) असा पराभव करत विजेते पदाला गवसणी घातली. आदर्श हा बालभारती स्कुल, नोएडा येथे 7वी इयत्तेत शिकत असून अंशूल गर्ग अकादमी येथे प्रशिक्षक अंशूल गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

मुलींच्या गटात हरीयाणाच्या सुहाना सैनी हीने कर्नाटकच्या अनर्गया मंजूनाथचा 4-0(13-11, 11-7, 11-4, 11-4) असा एकतर्फी पराभव करत विजेतेपद पटकावले. 12वर्षीय सुहाना हि स्कॉलर्स रॉजर सिनियर सेकंडरी शाळेत 9वी इयत्तेत शिकत असून चेन्नई टेबल टेनिस फाऊंडेशन येथे प्रशिक्षक आर आर राजेश यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

कॅडेट गटात पश्‍चिम बंगालच्या खेळाडूंनी विजेतेपद राखले. मुलांच्या गटात पश्‍चिम बंगालच्या इमॉन अधिकारीने महाराष्ट्र ब च्या गौरव पंचमचा 4-1(11-8, 6-11, 4-11, 11-6,11-4) असा सहज पराभव करत विजेतेपद पटकावले. इमॉन हा नैहाटी नरेंद्र विद्यानिकेतन शाळेत 6वी इयत्तेत शिकत असून नैहाटी युथ असोसिएशन येथे प्रशिक्षक मिहीर घोष आणि तापस सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे या वर्षातील हे दुसरे विजेतेपद आहे.

तर मुलींच्या गटात पश्‍चिम बंगालच्या सयानी पांडाने पश्‍चिम बंगालच्याच नंदिनी साहाचा 4-0(11-6, 14-12, 11-5, 11-6) असा एकतर्फी लढतीत सहज पराभव करत विजेतेपद पटकावले. 11 वर्षीय सयानी कोलकाता येथे हिंद मोटर अकादमी येथे अमिताभो साहा रामामोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते तर मिशन स्कुल येथे पाचव्या इयत्तेत शिकत असून तीचे या वर्षातील हे चौथे विजेतेपद आहे.

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक पारितोषिक देण्यात आले. आदर्श छेत्री, दिव्यांश श्रीवास्तव, स्नेहा भोवमीक,यशांश मलिक सौम्यदीप सरकार, पृथा व्हर्टिकर, सना डिसुझा, गौरव पंचगम, रेगान अलबुकर, इमॉन अधिकारी या खेळाडूंना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण सत्यम प्लसचे संस्थापक निकुंज झवेरी, आठ वेळेचे राष्ट्रीय विजेते व अर्जुन पुरस्कार विजेते कमलेश मेहता, माजी अंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू व्ही. चंद्रशेखर, राष्ट्रीय खेळाडू व अर्जुन पुरस्कार विजेत्या मोनालिसा मेहता, माजी राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू एस. रामास्वामी, नांदेड जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा संचालक राजेश शेलार आणि एमएसटीटीएचे सहसचिव प्रकाश तुळपुळे, स्मिता बोडस, सुचेता शेलार, विक्रम गुरजर, जतीन माळी, राहुल क्षिरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)