जीवनगाणे : प्रेम मागू नका, द्या…

अरुण गोखले

मानवी जीवनाचा खरा सुखा- समाधानाचा मंत्र शिकवताना ओशो सांगतात की, तुम्ही प्रेम घ्यायचा विचार न करता, आपण इतरांना निखळ प्रेम द्यायचे कसे? याचा विचार करा. घेण्यापेक्षाही देण्यातच जास्त आनंद सामावलेला असतो. ते म्हणतात, प्रेमाचा याचक न होता दाता किंवा देता होणं हेच खरं फार महत्त्वाचं आहे.

प्रेमाची अपेक्षा ही सामान्यत: सर्वांचीच नैसर्गिक गरज आहे. प्रत्येकालाच असं वाटतं असत की कोणी तरी आपल्यावर जीवापाड प्रेम करावं. आपल्याशी प्रेमाने वागावे, प्रेमाने चार शब्द बोलावेत, आपलेपणाने चौकशी करावी. मग हे असं तुम्हाला हवं हवंस वाटणार प्रेम हे इतरांच्या कडून मागण्यापेक्षा आधी तुम्हीच ते इतरांना द्यायला सुरुवात करा. तुम्ही देत गेलात ना की न मागता तुम्हाला हवं असणारं प्रेम आपोआप मिळायला लागेल.

प्रेम ही अशी अक्षय ठेव आहे की जी तुम्ही दिली, वाटली अगदी सढळ हाताने उधळलीत तरी ती कमी होणार नाही, तर ती वाढतच जाईल. त्या निरपेक्ष प्रेम देण्याचा सुखानंद तुमचे जीवन भरून टाकेल. लक्षात ठेवा की प्रेमाला मोजमाप नाही तर त्याला एक विकसनाचा, वृद्धीचा विशेष गुणधर्म आहे. ते दिल्याने, वाटल्याने, लुटविल्याने घटत नाही तर वाढत जाते. तुमच्या प्रेमाच्या ओलाव्याने अनेक जण कळत नकळत तुमच्याशी एक वेगळ्याच जवळिकतेच्या धाग्याने जोडले जातात. तुम्ही त्यांना हवे हवेसे वाटू लागता. तुम्हाला त्यांच्या घरात नाही तर मनात जागा मिळते.

प्रेम देताना कंजुषी करू नका. हातचं राखू नका, आपपरभाव ठेवू नका. प्रेम द्यायला शिकताना त्या मुक्‍त हस्ताने वाऱ्यावर सुगंध लुटविणाऱ्या फुलाकडे पाहा. सर्वांवर अमृत वर्षाव करणाऱ्या मेघाकडे पाहा, तना मनाला सुखावणाऱ्या वाऱ्याच्या शीतल झुळुकेकडे पाहा. निरपेक्ष प्रेमाची उधळण ही कशी करायची ते त्यांच्याकडून शिका.

नाहीतरी प्रेम द्यायला काय हवे? चेहऱ्यावर हसू, ओठावर गोडशब्द, दुसऱ्याच्या पाठीवरून फिरणारा मायेचा, सक्रिय मदतीचा हात आणि सर्वांप्रती ओतप्रोत भरलेलं एक सहृदय, ऐवढंच ना?

बस्स! ते जर तुमच्याकडे आहे आणि तुम्हाला जर खरं सुख-समाधान अनुभवायचं आहे, प्रेम हवं आहे तर प्रेमाचे याचक होऊ नका दाते व्हा, प्रेम तुम्हाला न मागता मिळेल. प्राणिमात्रांनाही प्रेम दिल्याने तेही त्यांचे प्रेम आपल्याला देत असतात. पाळीव प्राणी किंवा हिंस्र प्राणीही प्रेमामुळे जिंकता येतात. जगाला जिंकण्याची ताकद युद्धात नव्हे तर बुद्धात (शांतीत, प्रेमात)आहे. बुद्धांनी शांततेचा व प्रेमाचा संदेश दिल्याने जग आज त्यांना वंदन करीत आहे. येशूंनीही जगाला शांतीचा व प्रेमाचा संदेश दिला आहे. जगाने त्यांनाही वंदन केले आहे. त्यामुळे तुम्हाला प्रेम हवे असेल तर ते अगोदर दुसऱ्याला देणे आवश्‍यक आहे. प्रेमाच्या बदल्यात तुम्हाला प्रेमच मिळणार यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे “प्रेमाच्या मार्गाने जाणाऱ्यांना प्रेम मिळते’ हा मंत्र सदैव लक्षात असू द्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)