सहानुभूतीची लाट, विरोधी पक्ष भुईसपाट

लोकसभा निवडणूक : 1984

– विनायक सरदेसाई 

1984 च्या लोकसभा निवडणुकीला देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येची पार्श्‍वभूमी होती. आकस्मिकपणाने झालेल्या त्यांच्या दुर्दैवी हत्येमुळे संपूर्ण देश हळहळला होता. त्यांच्या हत्येनंतर दोन महिन्यांनी आठव्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणूक निकालांनी संपूर्ण देशालाच नव्हे तर जगालाही आश्‍चर्यचा धक्‍का दिला.

वास्तविक, सोळा वर्षे पंतप्रधान राहिलेल्या इंदिरा गांधींपुढे पुढील लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाला विजय मिळवून देण्याचे आव्हान होते. या निवडणुका जानेवारी 1985 मध्ये होणार होत्या. त्याचवेळी देश पंजाबमधील दहशतवादी कारवायांनी चिंतेत होता. सुवर्णमंदिराला जर्नेलसिंह भिंद्रनवाले आणि त्याच्या समर्थकांच्या ताब्यातून मुक्‍त करण्यासाठी सरकारने जून 1984 मध्ये “ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ चालवले होते. लष्कर आणि खलिस्तानवादी अतिरेक्‍यांमध्ये 24 तास गोळीबार सुरू होता. अखेरीस सुवर्णमंदिरातील हरमिंदर साहिबना उग्रवाद्यांच्या कब्जातून मुक्‍त करण्यात सरकारला यश आले. या कारवाईबाबत इंदिरा गांधींचे सर्वदूर कौतुक झाले असले तरी तेच त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले. 31 ऑक्‍टोबर 1984 रोजी इंदिराजींची अंगरक्षकांनी हत्या केली. या हत्येनंतर दोन महिन्यांनी झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आलेल्या सहानुभूतीच्या लाटेने कॉंग्रेसची झोळी भरून गेली. 514 जागांसाठी झालेल्या मतदानातून कॉंगेसला न भूतो न भविष्यति अशा 404 जागांवर विजय मिळवला. एकूण मतदानापैकी जवळपास अर्धे मतदान कॉंग्रेसच्या वाट्याला आले. चार वर्षांपूर्वी बनलेल्या भारतीय जनता पक्षाला केवळ दोन जागांवर विजय मिळवता आला. या निवडणुकांमध्ये मतदाराला विरोधी पक्षांचे ऐकूनच घ्यायचे नव्हते. तत्पूर्वी झालेल्या सात निवडणुकांमध्ये देशात अशी परिस्थिती बिलकूल नव्हती. पण 1984 च्या निवडणुकांनी नेहरू-गांधी घराण्यावरील लोकांचा विश्‍वास नव्याने समोर आला. कॉंग्रेसवगळता अन्य सात राष्ट्रीय पक्षांच्या वाट्याला केवळ 47 जागा मिळाल्या.

परिणामी, इतिहासात पहिल्यांदा लोकसभेमध्ये सशक्‍त विरोधी पक्षाची चणचण निर्माण झाली. निकालांनंतर राजीव गांधी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. या निवडणुका मागील निवडणुकांच्या तुलनेने खूप वेगळ्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच देशात 5000 हून अधिक उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यातील 4200 हून अधिक उमेदवारांना अनामत रक्‍कमही वाचवता आली नव्हती.

पंजाब-आसाममध्ये निवडणुका झाल्या नाहीत
1984 च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान पंजाब अशांततेने ग्रासला होता. तेथील उग्रवाद पूर्णपणाने शमलेला नव्हता. आसाममध्येही उग्रवाद्यांच्या हिंसक कारवाया वाढल्या होत्या. साहजिकच अशा वेळी तेथे निवडणुका घेण्यास पोषक परिस्थिती नव्हती. त्यामुळे पंजाबमधील 13 आणि आसाममधील 14 जागांसाठी लोकसभेसोबत निवडणुका झाल्या नाहीत.

वाजपेयींसह दिग्गज पराभूत
इंदिराजींच्या हत्येनंतर संपूर्ण देश दुःखाच्या लाटेत बुडून गेला होता. विरोधी पक्ष हतबल झाला होता. निवडणुकांचे निकाल आले तेव्हा अटलबिहारी वाजपेयींसह अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाल्याचे स्पष्ट झाले. अटलजी तेव्हा ग्वालियर मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार माधवराव सिंधिया यांच्याकडून 2 लाख मतांनी पराभूत झाले होते. विशेष म्हणजे ग्वाल्हेरमधून राजमाता विजयाराजे सिंधिया यांनी आपला मुलगा माधवराव यांच्याविरोधात प्रचार करून अटलजींसाठी मते मागितली होती. पण तरीही अटलजींचा पराभव झाला. हेमवतीनंदन बहुगुणा अलाहबादेतून पराभूत झाले.

नरसिंहराव हारले
एकीकडे अमिताभसारखा राजकारणाशी संबंधित नसलेला उमेदवार प्रचंड मतांनी विजयी झालेला असला तरी दुसरीकडे कॉंग्रेसची जबरदस्त लाट असूनही या निवडणुकीत पी. व्ही. नरसिंहराव मात्र पराभूत झाले. ते आंध्र प्रदेशातील हमनकोंडा लोकसभा मतदारसंघातून उभे होते.

भाजपाच्या जंगा रेड्डी यांनी नरसिंहराव यांचा 54 हजार मतांनी पराभूत केले. भाजपाला मिळालेली दुसरी जागा गुजरातमधील मेहसाणा येथील होती. तेथे भाजपाच्या ए. के.पटेल यांनी विजय मिळवला होता.

अलाहबादमधून अमिताभ विजयी
या निवडणुकांमधील विजयामुळे बॉलीवूडचा अभिनेता अमिताभ बच्चन यांचा संसदेत जाण्याचा मार्ग खुला केला. मुळातच त्या काळात अमिताभ लोकप्रियतेच्या शिखरावर होते. इंदिरा गांधींशी असणाऱ्या कौटुंबिक संबंधांमुळे अमिताभना अलाहबादमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले. त्यांच्याविरुद्ध हेमवतीनंदन बहुगुणा होते. या निवडणुकीत
अमिताभनी तब्बल 68 टक्‍के मते मिळवली. बहुगुणा यांना अमिताभनी 1लाख 88 हजार मतांनी पराभूत केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)