राज्यात स्वाईन फ्लूचे दहा महिन्यात 199 बळी 

मुंबई: औषधोपचारांना विलंब झाल्यांमुळे राज्यात जानेवारी ते ऑक्‍टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत सुमारे 199 रुग्णांचा बळी गेल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. राज्यात हवामानातील बदलामुळे स्वाईन फ्लू विषाणूचा प्रार्दुभाव वाढला असून उपचारासाठी औषधोपचाराचा प्रोटोकॉल पुढच्या दोन दिवसांत राज्यातील सर्व खासगी व महापालिकेच्या रूग्णालयांना पाठविण्यात येणार आहे, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.
नागरिकांनी सर्दी, ताप, घसा दुखीचा आजार अंगावर काढू नये. औषधोपचारानंतर 24 तासात बरे वाटले नाही तर डॉक्‍टरांच्या सल्ल्‌याने टॅमिफ्लूच्या गोळ्या सुरु कराव्यात, असे आवाहन डॉ.सावंत यांनी केले आहे. राज्यात ठिकठिकाणी स्वाईन फ्लू संशयित 16 हजार रुग्ण दाखल असून त्यांच्यावर खासगी तसेच महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. साथरोग नियंत्रणासाठी नेमलेल्या समितीची गेल्या आठवड्यात बैठक झाली. यावेळी व्हेंटिलेटरवर असलेल्या स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर करावयाच्या उपचारांमध्ये एकसुत्रीपणा यावा यासाठी औषधोपचारांचा प्रोटोकॉल करण्याबाबत चर्चा झाली. पुढील दोन दिवसामध्ये हा प्रोटोकॉल राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांना तसेच महापालिकेच्या रुग्णालयांना पाठविण्यात येईल. त्यानुसार त्यांनी स्वाईन फ्लू बाधित रुग्णांवर उपचार करणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.
रूग्णांनी आजार अंगावर काढला 
राज्यात खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालेल्यांचे डेथ ऑडिट रिपोर्ट प्राप्त होत असून त्यात औषधोपचारास विलंब हे एक प्रमुख कारण आढळून येत असून काही रुग्णांनी स्वत: सर्दी, तापावर गोळ्या औषध घेऊन आजार अंगावर काढला आहे. आठवड्याभरानंतरही प्रकृतीत फरक न पडल्याने त्यांनी डॉक्‍टरांकडे धाव घेतल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत स्वाईन फ्लूवरील उपचार वेळेत न सुरु झाल्याने मृतांची संख्या वाढली आहे, अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली.
नाशिक,पुण्यात रूग्णांची संख्या जास्त 
नाशिक, पुणे महापालिका क्षेत्रात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात आढळून येत असून महापालिका आयुक्तांनी या संदर्भात दर आठवड्याला आढावा बैठक घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनेबरोबरच जाणीव जागृती तसेच खासगी वैद्यकीय डॉक्‍टरांनी वेळेत उपचार करण्याबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)