‘गोड’ प्रचारतंत्र

 – सरोजिनी घोष

लोकसभा निवडणुकांचा ज्वर तापत चाललेला असताना पश्‍चिम बंगालमध्ये एक अनोखी गोष्ट पाहायला मिळत आहे. पश्‍चिम बंगाल हा मिठाईसाठी देशभरात ओळखला जातो. यंदा तेथील मिठाई दुकानदारांनी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून खास प्रकारची मिठाई तयार केली आहे. या मिठाईंवर वेगवेगळ्या राजकीय पक्षांची चिन्हे बनवण्यात आली आहेत. उदाहरणार्थ, गवतातून उगवलेली दोन फुले हे तृणमूल कॉंग्रेसचे चिन्ह मिठाईवर तयार करण्यात आले आहे. भाजपासाठीच्या मिठाईमध्ये केशरी रंगाचा वापर करण्यात आला आहे. तसेच शुभ्र पांढऱ्या मिठाईवर भाजपाचे चिन्ह असलेले कमळ बनवण्यात आले आहे. बंगालमध्ये अद्याप कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीची घोषणा झालेली नाही. तरीही मिठाई बाजारात मात्र “गठबंधन’च्या मिठाया आल्या आहेत. या मिठायांचे वैशिष्ट म्हणजे त्यावर एका बाजूल कॉंग्रेसचे हाताचे चिन्ह तर दुसऱ्या बाजूला डाव्या पक्षांचे विळा-हातोडा-तारा हे चिन्ह बनवण्यात आले आहे. आता पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना किंवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही मिठाई देऊन तोंड गोड करावे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रचाराचा हा अनोखा फंडा म्हणून लोकप्रिय झाल्यास नवल वाटायला नको.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)