पावसाळी पर्यटकांना ‘स्वीट कॉर्न’ची चटक

मागणी वाढली : दुष्काळामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मीच आवक

पुणे -“पावसाळ्यात पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या “स्वीट कॉर्न’ची मागणी वाढली आहे. मात्र, दुष्काळाचा फटका या उत्पादनाला बसला आहे. उत्पादन घटल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत मार्केट यार्डात निम्मीच आवक होत आहे. त्यामुळे भावदेखील दीडपट मिळत आहेत. घाऊक बाजारात किलोस चांगल्या मालास 15 ते 18 रुपये भाव मिळत आहे. जे गेल्या वर्षी 10 ते 12 रुपये किलो होते,’ अशी माहिती व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी दिली.

येथून होते आवक
सध्या मार्केट यार्डात जिल्ह्यातील खेड, मंचर, नारायणगाव भागातून आणि नाशिक जिल्ह्यातून आवक होत आहे. दररोज सुमारे 60 ते 80 टन आवक होत आहे. गेल्या वर्षी या काळात दररोज सुमारे 100 ते 125 टन आवक होती.

यंदा निर्यात नाही
महाबळेश्‍वर, खडकवासला, लवासा, लोणावळ्यासह विविध पर्यटन स्थळे आणि परराज्यांतून विशेषत: हैदराबाद येथून मागणी आहे. गुजरात, बडोदा येथून मागणी आहे. मात्र, मालाच्या तुटवड्यामुळे तेथे अद्याप निर्यात होत नाही.

खेड तालुक्‍यातून उत्पादन घटले
दरवर्षी आळंदीसह खेड तालुक्‍यातून “स्वीट कॉर्न’ची मोठी आवक होते. मात्र, यावर्षी पाण्याच्या टंचाईमुळे तेथे अत्यल्प उत्पादन झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वी घाऊक बाजारात 10 ते 12 रुपये भाव मिळत होता. मात्र, पाऊस सुरू होताच मागणी वाढली आहे. बाजारात कमी दर्जाच्या मालाचीही आवक होत आहे. त्यास प्रती किलोस 8 ते 12 रुपये भाव मिळत आहे, अशी माहिती व्यापारी माऊली आंबेकर यांनी दिली.

दुष्काळामुळे “स्वीट कॉर्न’ची लागवड यावर्षी शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात केली आहे. नेहमीच्या तुलनेत केवळ 30 टक्केच लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादन कमी झाले आहे. त्यात वातावरणातील बदलामुळे काही ठिकाणी पिंकावर रोगाचा प्रादुर्भावही आहे. मी दोन एकरची लागवड केली होती. मात्र, पाणी टंचाईमुळे नाममात्र उत्पादन झाले आहे. यावर्षी उत्पादन खर्चही निघालेला नाही.
– संदीप गायकवाड, “स्वीट कॉर्न’ उत्पादक शेतकरी, काळूज, ता. खेड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)