ट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून

कर्नाटकातून आरोपी ताब्यात; सातारा एलसीबीची कारवाई;  सात दिवसाची पोलिस कोठडी

सातारा – रोजी कराड तालुक्‍यातील मालखेड गावाच्या हद्दीत युवकाचा खून करणाऱ्या ट्रक चालकाच्या मुसक्‍या पोलिसांनी आवळल्या आहेत. पुण्याहून पेठवडगावला एका ट्रकमधून निघालेल्या स्वप्नील सुतार या युवकाचा गळा चिरून खून करण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवत ज्या ट्रकमधून स्वप्नील प्रवास करत होता. त्या ट्रकचालकाच्या मुसक्‍या चित्रदुर्ग (कर्नाटक) येथून आवळल्या. त्या चालकाने पैशासाठी खून केल्याचे कबुल केले आहे. तरीही कारण अद्याप अस्पष्टच असल्याने या खुनाचे गुढ कायम आहे. संदीप शिवशंकरअप्पा बुडगी (रा. चित्रदुर्ग, कर्नाटक ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव येथील युवक स्वप्निल गणेश सुतार हा पुण्याहून त्याच्या गावी जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान त्याचा मृतदेह सोमवार दि.11 रोजी सायंकाळी 6च्या सुमारास कराड तालुक्‍यातील मालखेड गावच्या हद्दीत पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाकडेच्या ऊसाच्या शेतात आढळून आला होता. त्याचे हात चिकटपट्टीने बांधून त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आल होता.

खूनाच्या घटनेनंतर पोलिस पथकांनी पुणे व पेठ वडगाव येथे अनेक ठिकाणी छापे टाकले होते. दरम्यान पुण्यात गेलेल्या पथकाला स्वप्नीलच्या एका मित्राने तो नवले ब्रिज येथून एका आयशर ट्रकमधून गावाल गेल्याची माहिती दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी टोलनाक्‍यासह विविध ठिकाणांच्या सीसीटीव्ही फुटेजचा तपास करून अनेक आयशर ट्रकची माहिती गोळा केली होती. मात्र टोलनाक्‍यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये (केए 16 डी 0863) हा आयशर ट्रक संशयास्पद असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर संबंधीत ट्रकची माहिती मिळवर एसलीबीचे पोलिस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांच्या पथकाने कर्नाटक राज्यातून संशयीत आरोपीला ताब्यात घेतला.

ही कारवाई जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख, अप्पर अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांच्या सुचनानुसार पोलिस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड,सहाय्यक फौजदार पृथ्वीराज घोरपडे,हवालदार आनंदराव भोईटे, विजय कांबळे, शरद बेबले, प्रविण फडतरे, रुपेश कारंडे, प्रमोद सावंत, मारूती आडागळे यांनी केली.

ताब्यातील आरोपीने आपण पैशासाठी खून केल्याची कबुली दिली असली, तरी स्वप्नीलच्याजवळ केवळ दोनशे पन्नास रुपये असल्याने ती शक्‍यता मावळली आहे. नेमका आरोपीने खून कशासाठी केला याचा तपास कराड तालुक्‍याचे पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर करत आहेत. दरम्यान महामार्गावरून प्रवास करताना नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. शक्‍यतो खासगी व अनोळखी वाहनाने प्रवास करू नये असे आवाहन जिल्हा पोलिस प्रमुखांनी केले आहे.

पोलिसांनी साधले टायमिंग

स्वप्नीलचा खून झाल्यानंतर घटनास्थळावरून व पुण्यातून नेमके पुरावे मिळत नसल्याने आरोपींपर्यंत पोहचण्यासाठी पोलिसांना अवघड झाले होते. मात्र स्वप्नीलच्या मित्राने सांगितलेले ट्रकाचे वर्णन अन्‌ टोलनाक्‍यावरील सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांनी काही आयशर निष्पन्न केले होते. तरीही अडचणी निर्माण होत होत्या. अखेर पोलिसांनी निष्पन्न केलेल्या गाड्या अन्‌ टोलनाक्‍यावरील फुटेज यांचा संबंध लावण्यास सुरूवात केली. त्यावेळी आरोपीची गाडी इतर गाड्यांच्या तुलनेत तब्बल 21 मिनिटे तासवडे टोलनाक्‍यावरून किनी टोल नाक्‍यावर पोहचली. हेच 21 मिनिटांचे टायमिंग साधत एलसीबीने आरोपीच्या मुसक्‍या आवळल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)