बंगळुरू – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्नाटक भेटीच्यावेळी त्यांचे हेलिकॉप्टर चित्रदुर्ग येथे लॅंडिग झाल्यानंतर त्या हेलिकॉप्टर मधून हा बॉक्स उतरवण्यात आला आणि तो तातडीने एका खासगी इनोव्हा गाडीत ठेवण्यात आला आणि गाडी तेथून लगेच निघून गेली. या बॉक्स प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी युवक कॉंग्रेसचे कर्नाटकातील पदाधिकारी श्रीवत्स यांनी केली असून त्यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली आहे. हा बॉक्स हेलिकॉप्टर मधून उतरवला जात असल्याचा व्हिडीओही त्यांनी शेअर केला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडुराव यांनीही आपल्या ट्विटरवर या विषयीचा एक व्हिडीओ शेअर केला असून या बॉक्स मध्ये नेमके काय होते व तो कोणासाठी आणण्यात आला होता याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.