समान पाणी पुरवठा योजनेला स्थगिती द्या

अटी व शर्थींचा भंग झाल्याचा सदस्याचा आरोप

पुणे – शहरातील बहुचर्चित चोवीस तास समान पाणी पुरवठा योजनेंतर्गत संबंधित ठेकेदाराकडून निविदेतील अटी-शर्तींचा भंग करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने केला आहे. त्यामुळे या योजनेच्या कामांला तातडीने स्थगित देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. नगरसेवक ऍड.भय्यासाहेब जाधव यांनी ही मागणी केली असून, तसे पत्रही त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरातील नागरिकांना मुबलक, जास्त दाबाने आणि समान पाणीपुरवठा होण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून चोवीस तास समान पाणी पुरवठा योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेची निविदा काढून “एल ऍन्ड टी’ कंपनीबरोबर करार करण्यात आला आहे. हा करार करताना शासनाला मुद्रांक शुल्कापोटी एक कोटी 20 लाख रुपये भरणे आवश्‍यक होते. परंतु या कंपनीने अद्याप मुद्रांक शुल्काचे पैसे जमा केलेले नाही. यामुळे मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी या ठेकेदार कंपनीला त्वरीत मुद्रांक शुल्क भरण्याला आणि मूळ करारनाम्याची प्रती जमा करण्याची नोटीस दिली आहे.

याशिवाय निविदा काढताना संबंधित कामांचा आणि कामगारांचा विमा या ठेकेदार कंपनीने उतरवणे बंधनकारक आहे. मात्र या ठेकेदाराने कामाचा आणि कामगारांचा विमा उतरविला नाही. विमा न उतरवल्यास देयक बिलातून एक टक्का म्हणजेच 18 कोटी रुपये महापालिका बिलातून कपात करून घेऊ शकते, असे करारात नमूद केले आहे. संबंधित ठेकेदार कंपनीकडून निविदेतील अटी आणि शर्तीचा भंग केला आहे. त्यामुळे शासकीय महसूल आणि विमा रक्कम भरेपर्यंत या कामाला स्थगिती द्यावी, अशी ऍड. जाधव यांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)