अवधानपूर्वक खाणे वजन घटवण्याचा सर्वोत्तम मार्ग (भाग 1) 

डॉ. तेजस प्रज्ञा यशवंत लिमये 

वजन कमी करण्याच्या आहाराबाबत रसिकाची आणि माझी चर्चा चांगलीच रंगली होती. आतापर्यंतच्या चर्चेतून वजन वाढण्यामागची कारणे, वजनासंबंधी सोप्या तपासण्या, अतिरिक्त वजनाचे दुष्परिणाम, आहारातील पांढरी विषे, उपवास व हॉटेलिंगचा वजनाशी संबंध, आहारातील भाज्या, फळे, मांसाहारी पदार्थ, दूग्धजन्य पदार्थ, चहा-कॉफी, पॅकबंद पदार्थ, त्यांवरील फूड लेबल वाचायचे तंत्र या सगळ्या विषयांबद्दल रसिकाला सखोल माहिती मिळाली होती. आता फक्त एकाच पण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलायचे राहिले होते – ते म्हणजे “अवधानपूर्वक खाणे’ (चळपवर्षीश्र एरींळपस).
मी रसिकाला म्हणाले, “काय खायचे, काय नाही, हे आता तुला चांगले समजले, पण मला एक गोष्ट सांग, खाताना तुझे खाण्याकडे नीट लक्ष असते का? की एकीकडे टी.व्ही,, मोबाइल सुरू असताना खातेस?’

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“मी एकटी असेन तर मला जेवायचा फारच कंटाळा येतो. मग मी मोबाइल वर फेसबुक/व्हॉट्‌सऍप वगैरे बघत जेवते. सगळे एकत्र असताना तर टीव्हीसमोरच जेवतो आम्ही!’ रसिका म्हणाली. त्यात तिला काहीही वावगे वाटत नव्हते!
घरोघरी हीच परिस्थिती असते हे मला माहिती होते, पण रसिकाला यातून बाहेर काढणे गरजेचे होते. मी म्हणाले, “जेवायला साधारण किती वेळ लागायला हवा? 15 ते 20 मिनिटे. तेवढा वेळही आपण एका जागी शांत बसू शकत नाही? कशाला लागतो टीव्ही/लॅपटॉप/मोबाइल? काही जण तर पेपर वाचत किंवा पुस्तक वाचत जेवतात. खरंच गरज असते का याची?’ आपल्याला कल्पनाही नसते की अन्न आपल्या ताटात येईपर्यंत त्यामागे किती जणांचे कष्ट असतात ते! सुरुवात होते शेतकऱ्यापासून.

एकदा घरी एखादी भाजी/धान्य लावून बघ; तुला कल्पना येईल शेतकऱ्यांच्या कष्टाची. फक्त शेतकरीच नाहीत तर नंतर अन्नाची वाहतूक, साठवणूक करणारे, बाजारातील विक्रेते, बाजारातून ते घरी घेऊन येणाऱ्या व्यक्तीचे कष्ट आणि घरी आणल्यानंतरदेखील ते अन्न प्रेमाने शिजवून, चविष्ट पदार्थ ताटात वाढणाऱ्यांचे कष्ट. या सगळ्यांनी कष्टाने, प्रेमाने केलेल्या सुग्रास अन्नाकडे लक्ष न देत जेवणे, त्याला नावे ठेवणे हा या सगळ्यांचा अपमानच नाही का?’

रसिकाच्या डोळ्यात पाणीच आले. “खरंय गं तुझं, अगदी खरंय. मुलाने किंवा नवऱ्याने जेवणाला नावे ठेवली की, मला भयंकर राग येतो, माझ्या कष्टाची कोणाला पर्वाच नाही, असे वाटते. पण अन्नाकडे लक्ष न देता जेवून मीदेखील अन्नाचा, ते पिकवणाऱ्यांचा अपमान करतेय, हे लक्षात येत नाही गं.’ रसिका म्हणाली.
“हं, अगं तूच अन्न शिजवतेस. तू तरी त्याच्याकडे लक्ष देऊन खाल्ले पाहिजेस ना?’ मी म्हणाले.
“बदलेन आता मी नक्की.’ रसिका मनापासून म्हणाली.

मला आई-बाबांनी जेवणाआधी म्हणण्यासाठी एक सुंदर प्रार्थना शिकवली होती. त्यात हा सगळा विचार मांडला होता.
वदनी कवळ घेता, नाम घ्या मातृभूचे।
सहज स्मरण होते, आपुल्या बांधवांचे।।
कृषीवल कृषीकर्मी राबती दिवसरात्र।
श्रमिक श्रम करोनी वस्तू या निर्मितात।।
स्मरण करूनी त्यांचे अन्न सेवा खुशाल।
उदरभरण व्हावे चित्त होण्या विशाल।।
मी रसिकाला प्रार्थना म्हणून दाखवली.

“किती छान आहे! जेवायला सुरुवात करताना मातृभूमीचे, आपल्या देशबांधवांचे, अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्याचे, इतर कष्टकऱ्यांचे स्मरण करा आणि मन मोठे होण्यासाठी अन्नाचे सेवन करा!! फार आवडली मला. आता ही प्रार्थना मी सुजयला शिकवते. आम्ही म्हणत जाऊ जेवणाआधी. म्हणजे लक्षात राहील जेवणाकडे लक्ष द्यायचे!’ रसिका म्हणाली.
“आपल्याला शाळेतही एक प्रार्थना शिकवली होती. अन्नसेवनाने देशसेवेसाठी शक्ती मिळावी असा विचार त्यात मांडला होता. आठवते का तुला?’
मुखी घास घेता करावा विचार,
कशासाठी हे अन्न मी सेवणार?
घडो माझिया हातूनी देशसेवा,
म्हणोनी मिळावी मला शक्ती देवा!
मी रसिकाला आठवण करून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)