अवधानपूर्वक खाणे वजन घटवण्याचा सर्वोत्तम मार्ग (भाग 2) 

डॉ. तेजस प्रज्ञा यशवंत लिमये 

“हो तर! पण आता ह्या चांगल्या सवयी विस्मरणात गेल्या आहेत. सुरू करायला हवे हे परत!’ रसिकाने कबुली दिली.
“खरंय. आणि तुला माहीत आहे का की, आपले जेवणाकडे लक्ष नसेल तर आपण गरजेपेक्षा जास्त खातो. पोट भरले की नाही याकडे आपले लक्ष नसते, आपण नीट चावून खातो की नाही, याकडेही आपले लक्ष नसते. तू सांग बरं तू एक घास किती वेळा चावून खातेस?’ मी रसिकाला विचारले.

“नाही गं, नाही सांगता येणार! कारण लक्षच नसते माझे खाण्याकडे. पण आता लक्ष देईन मी. किती वेळा चावायला हवा एक घास?’ रसिकाने विचारले.

“आपण पूर्वापारपासून ऐकत आलोय की, एक घास 32 वेळा चावून खावा. बत्तीस या आकड्यामागे जरी काही शास्त्र नसले, तरी यामागचा विचार असा आहे की प्रत्येक घास व्यवस्थित चावून खायला हवा. त्यात तोंडातली लाळ चांगली मिसळायला हवी. त्या घासातील अन्नाची चव, वास याची जाणीव आपल्याला व्हायला हवी, त्याचा आनंद आपण घ्यायला हवा. यालाच तर म्हणतात अवधानपूर्वक खाणे! असेही सांगितले जाते की, अन्न द्रव अवस्थेत जाईपर्यंत ते चावले पाहिजे आणि मग गिळले पाहिजे. (द्रव अवस्थेत जाईपर्यंत अन्न चावल्यास ते आपोआपच गिळले जाते!) यामुळे कमी प्रमाणात खाऊनदेखील पोट भरल्याची भावना लवकर येते. आपसूकच वजन कमी व्हायला मदत होते. शिवाय पोटाचे त्रास कमी होतात, इतरही काही आजारांचा प्रतिबंध करायला मदत होते.’ मी रसिकाला माहिती दिली.
“वजन कमी करण्यासाठी खरं तर अगदी सोपा उपाय आहे हा!’ रसिका म्हणाली.
“अवधानपूर्वक खाण्यामध्ये
अन्नाकडे लक्ष देणे,
नीट चावून खाणे,
अन्नाचा आस्वाद घेणे या गोष्टी तर येतातच, शिवाय गरज असेल तेव्हाच खाणे आणि शरीरासाठी आरोग्यदायी पर्याय निवडणे यांचाही समावेश होतो.’ मी पुढे म्हणाले.

“आरोग्यदायी पर्याय निवडणे याबाबत तू मला खूपच छान माहिती दिली आहेस; पण गरज असेल तेव्हाच खाणे म्हणजे काय?’ रसिकाने विचारले.

“…म्हणजे भूक लागल्यानंतर खाणे. आपल्या जीवनशैलीत एक शिस्त हवी, म्हणजे ठराविक वेळेला भूक लागते. तू तुझ्या स्वतःच्या जीवनशैलीकडे एकदा बारकाव्याने बघ, एका त्रयस्थ माणसासारखे तुझे
स्वतःचे निरीक्षण कर. तुझ्या लक्षात येईल की, आपण बऱ्याचदा भूक लागली नसतानाही खातो.
सगळे खात आहेत म्हणून खाणे,
समोर अन्न आले म्हणून खाणे, कंटाळा आला आहे म्हणून खाणे, आवडीचा पदार्थ पोट भरले असतानाही खाणे, दु:खी किंवा निराश असताना मूड चांगला करण्यासाठी गोड-धोड किंवा चमचमीत खाणे. हे सगळे त्याचेच प्रकार झाले. कधी कधी भूकेच्या वेळीदेखील आपण खात नाही. चहा-कॉफी घेऊन भूक मारतो, कामाच्या गडबडीत खाण्याकडे दुर्लक्ष करतो, हे दोन्ही प्रकारचे टोकाचे वागणे टाळायला हवे. खाणे सुरू करण्यापूर्वी “मला खरंच भूक लागली आहे का आणि मी जे खाणार आहे त्याचा माझ्या शरीराला फायदा होणार आहे का?’ असे प्रश्‍न स्वतःला विचारायला हवेत. रामदास स्वामी म्हणायचे – “अखंड सावधान असावे!’ त्यांचा हा मंत्र आपण खातानाही आचरणात आणायला हवा.’ मी बोलत होते; रसिका मन लावून ऐकत होती.

“शेवटची महत्त्वाची गोष्ट सांगू का, आपण आपल्या स्वतःवर, आपल्या शरीरावर जीवापाड प्रेम करायला हवे. फक्त वरवरच्या दिसण्याचा विचार न करता आपले शरीर आतून कसे सुंदर राहील, निरोगी राहील, याचा विचार करायला हवा. आपल्याला एकच शरीर मिळले आहे, त्याला रिप्लेसमेंट नाही, की त्याचे स्पेअर पार्टस्‌ मिळत नाहीत. त्यामुळे आहे ते शरीर मी उत्तम ठेवेन ही भावना कायम मनात हवी. आपल्या प्रियजनांना त्रास होऊ नये म्हणून आपण झटत असतो. तशीच भावना आपल्या प्रिय शरीराबाबतही हवी.

जर एखादा पदार्थ सतत खाल्ल्यामुळे/खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे माझ्या शरीरातील साखर वाढणार असेल, चरबी वाढणार असेल, माझे वजन वाढून माझ्या लाडक्‍या हृदयावर/ यकृतावर/मूत्रपिंडांवर/स्वादुपिंडावर, गुडघ्यांवर, मणक्‍यांवर ताण पडणार असेल तर तो पदार्थ/सवय मला सोडायला हवी, याची जाणीव व्हायला हवी; त्या दृष्टीने कृती व्हायला हवी. असे केल्यास फक्त वजनच नाही तर तुझे एकूण आरोग्यच उत्तम रहाण्यास मदत होईल. यासाठी तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा!’ मी म्हणाले.

“नवीनच दृष्टिकोन मिळाला आपल्या चर्चेतून! यापुढे मी नक्की या सगळ्या गोष्टींचा विचार करीन आणि लवकरच वजन कमी करून तुला पुन्हा भेटायला येईन!’ भारावलेल्या रसिकाने माझा निरोप घेतला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)