सोलापूर (प्रतिनिधी) – गोळीबारात जखमी झालेले सुरेश पाटील यांचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अक्कलकोट तालुक्यातील शेगांव येथे शनिवारी सकाळी सातच्या सुमारास वाळू व्यावसायीक सुरेश उर्फ महादेव पाटील यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणी पोलीस तपास सुरू करण्यात आला आहे.
गावातील सरपंच पिंटू पाटील यांनी महादेव पाटील यांच्यावर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. भावकी तसेच पोलीस-पाटील कोणी व्हायचं यावरुन दोघात वाद सुरु होता. त्यातच वाळू व्यावसायातील वैमनस्यही उफाळून आल्याने हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. अलीकडेच महादेव पाटील यांच्या वाळू ठेक्यांवर तालुका प्रशासनाने कारवाई केली होती. ही कारवाई होण्यामागे पिंटू पाटील असल्याचा असा संशय महादेव पाटलांना आहे. यातूनच दोघांत वाद झाला त्याचे पर्यावसन गोळीबारात झाले असल्याचे बोलले जात आहे. महादेव यांच्या उजव्या कंबरेच्या बाजूस गोळी लागली होती. महादेव पाटील यांना त्यांचे काका गुरुनाथ पाटील यांनी रुग्णालयात दाखल केले होते.