आंदोलनाचा इशारा देताच सुरेशनगरला टॅंकरने पाणी 

नेवासाफाटा – नेवासा तालुक्‍यातील आदर्शगाव सुरेशनगर येथील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांसाठी वारंवार टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने गुराढोरांसह रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देताच प्रशासनाच्या वतीने सुरेशनगरला टॅंकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. यामुळे सरपंच पांडुरंग उभेदळ यांनी केलेल्या प्रयत्नांना व गावकऱ्यांनी घेतलेल्या खमकी भूमिकेला यश आले आहे.

नेवासा तालुक्‍यातील सुरेशनगर हे राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श गाव आहे. यावर्षी पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला, त्यामुळे सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी येथील तलावात जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन मागील महिन्यात केली होती. मात्र याबाबत एक महिना उलटून गेला तरी प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. तसेच युद्धपातळीवर कार्यवाही ही केली नाही.

यामुळे सोमवारी ( दि.10) सर्व गावकरी एकत्रित आले व त्यांनी आपल्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून गुराढोरासह नगर औरंगाबाद हायवेवर शनिवारी (दि.15) रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने प्रशासन खडबडून जागे झाले आणि गावात केलेल्या मागणीची एक महिन्यांनी दखल घेत सोमवारी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. तसेच पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या विहिरीत टॅंकरने पाणी टाकण्यात आले. आदर्शगाव सुरेशनगरचे सरपंच पांडुरंग उभेदळ यांनागावकऱ्यांनी दिलेल्या खंबीर साथीने सुरेशनगरला टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात आला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)