बोंडारवाडी धरण समितीचा उदयनराजेंना पाठिंबा

सातारा  – बोंडारवाडी धरणासाठी अनेक प्रकल्पग्रस्तांसाठी उदयनराजे भोसले सुरुवातीपासून प्रत्येक टप्प्यावर ठोस पाठपुरावा केला आहे. जनतेच्या विकासासाठी महाराजांची तळमळ लक्षात घेता ती प्रगती अखंडित राहण्यासाठी बोंडारवाडी परिसरातील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.

बोंडारवाडी धरण कृती समितीने याबाबत पत्रक प्रसिध्दीला दिले असून त्यात पाठिंब्याची घोषणा केली आहे. याबाबतच्या प्रसिध्दीपत्रकात कृती समितीने म्हटले आहे की, जावली तालुक्‍यातील मेढा – केळघर विभागातील विविध 54 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न शाश्‍वतरित्या मार्गी लावण्यासाठी बोंडारवाडी धरण उपयुक्त ठरणार आहे. हे धरण व्हावे म्हणून तालुक्‍यातील जनता आणि कृती समिती गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत होती. मात्र दिनांक 09 एप्रिल 2018 रोजी नाशिकच्या नियोजन व जलविज्ञान केंद्राने नियोजित बोंडारवाडी धरणास पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देता येणार नसल्याचे कळविले होते. त्यामुळे कृती समिती व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी दिनांक 14 मे 2018 रोजी मोर्चाचे नियोजन करुन तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतू खा. उदयनराजे भोसले यांनी स्वत: मध्यस्थी करुन 5 मे 2018 रोजी जलसंपदामंत्री व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सिंचन भवन येथे घेतली व बोंडारवाडी धरणास प्रशासकीय मान्यता मिळवली त्यानंतर दिनांक 24 ऑक्‍टोबर 2018 रोजी जलसंपदा खात्याने या धरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. त्यानंतरच्या प्रत्येक टप्प्यावर उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री यांना पत्रव्यवहार करून या धरणासाठी पाठपुरावा केला आहे.

धरणाच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून दिनांक 15 फेब्रुवारी 2019 रोजी शासनाने या धरणासाठी 516.00 दलघन पाण्याचे आरक्षणास मंजुरी दिल्याने परिसरातील 54 गावांच्या पिण्याची शाश्‍वत सोय होणार आहे. येत्या सहा महिन्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून धरणासाठीचा प्रस्ताव मंजुर करुन धरणाच्या कामास सुरुवात होईल असे कृती समितीस खात्रीशीर वाटत आहे. उदयनराजे भोसले यांच्यामुळेच बोंडारवाडी धरणाच्या कामास गती मिळाली असुन या परिसराचा विकास घडवण्यासाठी महाराजांसारखे लढवय्ये नेतृत्व पुन्हा संसदेत असणे गरजेचे आहे. त्यामुळे परिसरातील 54 गावातील बोंडारवाडी धरणाचे लाभार्थी महाराजांनाच मतदान करतील असा निर्धार या प्रसिद्धीपत्रकात व्यक्‍त करण्यात आला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)