लक्षवेधी : आधारच असतो महत्त्वाचा!

-डॉ. निखिल कणसे

बायपोलर डिसऑर्डर हा आजार वयाच्या साधारणतः तिशीत वगैरे सुरू होतो आणि त्यात व्यक्‍तीची मनःस्थिती कधी उदासीन तर कधी हास्यवायू किंवा अतिउत्साह यात गुरफटलेली असते. काही काळ व्यक्ती उदासीनतेत म्हणजेच सतत उदास वाटणे, आत्मविश्‍वास कमी होणे, नकारात्मक विचार येणे, आत्महत्येविषयी विचार येणे, झोप व भूक बिघडणे, आवडी-निवडीच्या गोष्टींमध्ये निरुत्साह वाटणे अशा प्रकारची लक्षणे दिसतात.

मानसिक आजार झालेल्या व्यक्‍ती पण आपल्या समाजाचाच भाग आहे आणि आपल्या सर्वांची समाजाचा घटक म्हणून त्यांची काळजी घेणे ही सर्वांची जबाबदारी आहे असे मला वाटते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मी प्रॅक्‍टिस सुरू करून थोडेच दिवस झाले असताना सुरुवातीच्या दिवसात जवळच्याच गावात राहणारे एक बाबा आणि सोबत पूर्ण वाकलेली एक आजी, हातात काठी, नऊवारी साडी, साधारणतः वय 78-80 च्या घरात असेल.

“नमस्कार, मी रामचंद्र काळे (नाव बदललेले आहे), वय वर्षे 82, हिला तुम्हाला दाखवायला घेऊन आलोय, हे सर्व जुने पेपर आणि फायली घ्या.’ त्या बाबांनी फायलीच्या 2-4 थप्प्या आणि जुने काही पेपर्स माझ्या टेबलवर ठेवले. “बाबा मी आधी थोडी माहिती घेतो आणि तुमचे सर्व पेपर्स पाहतो,’ म्हणत मी हिस्टरी घेण्यास सुरुवात केली. सगळे जुने पेपर्स पण पाहिले.

संपूर्ण माहिती घेतल्यावर या आजीला बायपोलर डिसऑर्डर नावाचा मानसिक आजार आहे, हे माझ्या लक्षात आले. अति उत्साहाच्या भरात उदासीच्या अगदी विरुद्ध लक्षणे दिसतात. म्हणजेच उत्साह खूप वाढणे, मोठमोठ्या गप्पा करणे, अति प्रमाणात पैसे खर्च करणे, बोलण्याचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होणे इत्यादी. हा आजार पुरुष व महिला दोघांमध्येही आढळतो, तर कधीकधी या आजारांमध्ये भ्रम/भास किंवा संशयसुद्धा आढळून येतात. हा आजार उदासीनता व अति उत्साह अशा मालिकांमध्ये आढळून येतो. कोणती मालिका आधी किंवा नंतर येईल हे काहीच सांगता येऊ शकत नाही. यामध्ये दोन मालिकांमधला काळ हा एकदम नॉर्मल दिसून येतो. या नॉर्मल काळामध्ये कोणी व्यक्ती त्या व्यक्तीला आजार आहे हे देखील पाहून ओळखणे अवघड असते.

मी सांगायला सुरुवात केली असता मला मध्येच थांबवत बाबा म्हणाले, “सध्या आजी हायपर फेजमध्ये आहे. खूप बडबड करतेय. पाय दुखेपर्यंत व्यायाम करतेय, आहार वाढलाय आणि बघा डॉक्‍टर तिची झोपच कमी झालीय. पहाटे 4 ला उठून मोठ्याने आरत्या म्हणतीय. मला काही हे नवीन नाही. मी गेली 40-45 वर्षे आजीला सांभाळतोय. मला सगळं माहिती आहे डॉक्‍टर.’

म्हणता म्हणता बाबांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्यांच्या मागच्या सर्व आठवणी सांगितल्या. आजीला झालेल्या मानसिक आजाराविषयीचा त्यांचा विचार पण सांगितला. बाबा अशिक्षित आहेत, शेती करतात, परिस्थिती पण बेताची आहे. आजीला स्वतः स्वयंपाक करून खायला घालतात, घरची साफसफाई, भांडी/कपडे धुणे, शेती सगळं स्वतः पाहतात.

आजीचे पेपर्स पाहताना आणखी एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की एकदाही त्यांचा मानसोपचार तज्ज्ञांकडे फॉलो-अप चुकलेला नव्हता. वेळच्या वेळी औषध न चुकता स्वतःहून आजीला देणे, रिक्षाने, एसटी किंवा मिळेल त्या वाहनाने आजीला हॉस्पिटलला घेऊन येणे, या सगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या आणि मीही पाहिल्या. एखाद्या खेडेगावामध्ये मानसोपचार तज्ज्ञ भेटणे ही खूप दुर्मिळ बाब आहे.

आजीला मानसोपचार तज्ज्ञांकडे पुण्याला घेऊन जाणे, म्हणजे एक कसरतच असणार; तरीही तिच्या उपचारात काही खंड नव्हता याचं मला नवल वाटत होतं. त्यात मानसोपचार तज्ज्ञाकडे जायचे म्हणजे वेड्याच्या डॉक्‍टरकडे जायचे, लोक काय म्हणतील, हसतील असा ग्रामीण भागाचा समज असेल; पण बाबांचे विचार याच्या जवळपाससुद्धा नव्हते.

आजीला बायपोलार डिसऑर्डर आहे, यापेक्षा मला बाबांनी सांगितलेल्या सर्व गोष्टीच नवल वाटलं. आजीला खूप जीव लावतात, तिची काळजी घेतात याचा आनंदही वाटला. पुण्यात जायला खिशाला आणि तब्येतीला परवडत नाही यासाठी ते माझ्याकडे पहिल्यांदा आलेले. पैसे असो व नसो पण माझ्याकडेही यायला ते कधी चुकलेत असं मला आठवत नाही. त्यात “आजीवर माझा जीव आहे आणि तिचाही माझ्यावर आहे,’ असही नेहमी आवर्जून सांगतात. आजींना मूलं आहेत, पण ते एवढं लक्ष देत नाहीत ही गोष्ट काय सांगायलाच नको.

याउलट काही लोकांना पाहिलं की, बाबा अशिक्षित आहे ही गोष्ट किती छान वाटू लागते; तर काही शिक्षणाने प्रगत म्हणवणाऱ्या किंवा शहाणं समजणाऱ्या लोकांचा हेवा वाटू लागतो. या प्रकारचा किंवा कोणताही मानसिक आजार झाला की आपल्या साथीदाराला/नातेवाईकाला नको तशी वागणूक देणे, भांडण करणे, त्या व्यक्‍तीला एकटं पाडणं, दोष देणे फारच झालं तर डिव्होर्सही देऊन टाकणे किंवा यापेक्षाही भयाण प्रकार आजकाल सभोवताली घडत असतात.

खरं तर याला मानसिक आजाराच्या अटींची गरज नाहीये. काही बदल व्हावेत म्हणून मी बाबांचं उदाहरण नेहमी सगळ्यांना सांगत असतो. आजाराविषयीची त्यांची समजूत, पत्नीवरचे प्रेम, आजीला सर्वस्वी समजून घेणे, तिला साथ देणे, घरातल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणं आणि अशा बऱ्याच गोष्टी खरंच शिकायला आणि सर्वांना विचार करायला लावणाऱ्या आहेत हे नक्की…

असे किंवा या प्रकारचे मानसिक आजार असतात हेच मुळी बऱ्याचदा माहीत नसतं. मग त्यातून साधू/ढोंगी लोकांकडे त्या व्यक्‍तीस नेणे, त्याला बांधून ठेवणे, गावाबाहेर काढणे किंवा कुठे तरी अज्ञात ठिकाणी जनावरासारखे सोडून देणे, हे प्रकार काही नवीन नाहीत. बाबांच्या बाबतीत हे काहीच नव्हतं, हेच मुळात कौतुकास्पद आहे.

शारीरिक आजारांसारखंच मानसिक आजाराला ही समजून घेणे, त्यावर योग्य ते उपचार घेणे, औषधे वेळोवळी न चुकता घेणे, त्या व्यक्‍तीस आधार देणे आणि कोणत्याही परिस्थितीत व्यक्‍तीस साधू ढोंगी लोकांकडे न नेता मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे कधीही योग्य होय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)