पोषण आहारासह विद्यार्थ्यांना पूरक आहार

तीन दिवस अंडी, दूध आणि फळे देणे बंधनकारक

कुरकुंभ – महाराष्ट्र राज्याच्या महसूल व वनविभागाने दौंड तालुक्‍यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. या अनुषंगाने राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागातील शालेय पोषण आहारातील पात्र शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना पूरक आहार देण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत दौंड तालुका गटशिक्षण अधिकाऱ्यांनी तालुक्‍यातील पात्र शाळेतील मुख्याध्यापकांना 1 जुलै 2019 पासून पूरक आहार देण्यासंदर्भात सूचना पत्र दिले आहे.

तालुक्‍यातील सर्व पात्र शाळांना यापुढे विद्यार्थ्यांना पोषण आहार देताना शासनाच्या निर्देशाप्रमाणे आठवड्यातून तीन दिवस अंडी, दूध आणि फळे देणे बंधनकारक बनले आहे. दैनंदिन आहारातून विशिष्ट जीवनसत्वे मिळावेत, यासाठी पूरक आहार सुरू केला आहे. प्राथमिक तसेच माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी म्हणून शासनाने शालेय पोषण आहार सुरू केला होता. या पोषण आहार योजनेंतर्गत यापूर्वी आठवड्यातून एकदा देण्यात येणाऱ्या पूरक आहारामध्ये कोणताही बदल नसून, त्याची पूर्वीप्रमाणेच अंमलबजावणी सुरू राहील याची दक्षता घ्यावी, तसेच दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारा पूरक आहार प्रत्येक आठवड्याच्या सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी देण्यात यावा, तसेच ठरवून दिलेल्या दिवशी शाळेस सुट्टी असल्यास लगतच्या दिवशी सदरचा आहार द्यावा, असे पत्रात नमूद केले आहे.

आहार स्वच्छ असणार का?
शासनाने दौंड तालुका मध्यम स्वरूपाचा दुष्काळ ग्रस्त जाहीर करून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात दूध, अंडी, फळे या पूरक आहाराचा समावेश केला आहे. मात्र, तालुक्‍यातील एका अंगणवाडीमधील शालेय पोषण आहारात आळ्या सापडल्याचे प्रकरण ताजे असतानाच संबधित अधिकारी सरकारने सुरू केलेल्या पूरक आहाराची कशा प्रकारे अंमलबजावणी करतात, हे पाहण्यायोग्य बनले आहे.

दौंड तालुक्‍यातील शालेय पोषण आहार देणाऱ्या सर्व पात्र शाळांमध्ये शालेय पोषण आहारासोबत पूरक आहार देण्यात येणार आहे. यामध्ये दूध, अंडी आणि फळे यांचा समावेश असणार आहे. शालेय पोषण पात्र सर्व शाळांमध्ये पूरक आहार देणे बंधनकारक आहे. याबाबत सर्व पात्र शाळांनी पूरक आहाराची कठोर अंमलबजावणी करण्याबाबत तालुक्‍यातील सर्व शाळेतील मुख्याध्यापकांना सूचना पत्र दिले आहे.

– गोरक्षनाथ हिंगणे, गटशिक्षण अधिकारी, दौंड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)