जॉनी बेअरस्ट्रोच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर हैदराबादचा कोलकातावर विजय

हैदराबाद – डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्ट्रो यांनी केलेल्या तुफान फटकेबाजीच्या बळावर सनरायजर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सचा 9 गडी आणि तीस चेंडू राखून पराभव करत आगेकूच केली. या विजयाने हैदराबादचे 10 गुण झाले असून ते क्रमवारीत चौथ्या स्थानी पोहोचले आहेत.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने निर्धारित 20 षटकांत 8 बाद 159 धावांची मजल मारून हैदराबादसमोर विजयासाठी 160 धावांचे लक्ष्य ठेवले होते. यावेळी हैदराबादने हे आव्हान केवळ 15 षटकांत 1 गडी गमावून 161 धावा करत पूर्ण करत सामन्यात दणदणीत विजय मिळवला.

यावेळी प्रत्युत्तरात उतरलेल्या हैदराबादने धमाकेदार सुरुवात करत पहिल्याच षटकापासून कोलकाताच्या गोलंदाजांवर हल्ला चढवायला सुरुवात केली. त्यामुळे कोलकाताचे गोलंदाज बळी मिळवण्यापेक्षा केवळ धावा वाचवण्यावर भर देताना दिसत होते. त्यामुळे त्यांच्यावरील दबावाचा फायदा घेत हैदराबादचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्ट्रो यांनी चौफेर धुलाई करत पॉवरप्लेच्या सहा षटकांमध्ये हैदराबादला 72 धावांची मजल मारुन दिली. तर, दोघांनी केवळ 4.3 षटकांतच संघाचे अर्धशतक फलकावर लावले होते.

यावेळी हे दोन्ही सलामीवीर ज्या प्रकारे फलंदाजी करत होते ते पाहता हे दोघेही लवकरात लवकर सामना संपविण्याच्या प्रयत्नात असल्याचे भासत होते. यावेळी दोघांनीही फटकेबाजी करत 8.4 षटकांतच संघाला शतकी मजल ओलांडून दिली. संघाच्या शतकाबरोबर डेव्हिड वॉर्नरने 28 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पुर्ण केले. तर, जॉनी बेअरस्ट्रोनेही 28 चेंडूतच आपले अर्धशतक पूर्ण करत वॉर्नरच्या साथीत शंभर धावांची भागीदारी नोंदवली. यावेळी आपले अर्धशतक झळाकवल्यानंतर धावांचा वेग वाढवण्याच्या नादात वॉर्नर 38 चेंडूत 67 धावा करून परतल्यानंतर बेअरस्ट्रोने केन विल्यम्सनच्या साथीत संघाच्या विजयावर शिक्‍कामोर्तब केला. यावेळी बेअरस्ट्रोने 43 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 80 धावा केल्या.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या कोलकाताने पहिल्या 3 षटकांमध्येच 44 धावांची मजल मारली होती. यावेळी सुनील नारायणने 2 षटकार 3 चौकार मारत केवळ 8 चेंडूत 25 धावा केल्या. मात्र, 25 धावांवर खलीलने त्याचा त्रिफळा उडवत हैदराबादला पहिला बळी मिळवून दिला.

नारायण बाद झाल्यानंतर पॉवर प्लेमध्ये आक्रमक खेळण्याची जबाबदारी ख्रिस लिनने उचलली. त्याने फटकेबाजी करत 5 व्या षटकांत संघाचे अर्धशतक धावफलकावर लगावले. मात्र, त्याला दुसऱ्या बाजूने इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. नारायण पाठोपाठ शुभमन गिल अवघ्या 3 धावा करून माघारी परतला. तर, नितीश राणा 11 धावा तर कर्णधार दिनेश कार्तिक केवळ 6 धावा करुन परतल्याने कोलकाताचा संघ चांगल्या सुरुवातीनंतर लागोपठ पडत चाललेल्या विकेट्‌सने दबावात आला.

त्यानंतर आलेल्या रिंकू सिंगने लिनला साथ देत पाचव्या गड्यासाठी 51 धावांची भागिदारी रचली. त्यामुळे कोलकाताला 15 षटकांत 125 धावांची मजल मारता आली. दरम्यान, रिंकू सिंग धावगती वाढवण्याच्या नादात 30 धावांवर संदीप शर्माच्या गोलंदाजीवर राशीद खानकडे झेल देवून परतला. त्यानंतर लिनने आपले अर्धशतक पूर्ण केले.

रिंकू बाद झाल्यानंतर रसेल फलंदाजीस उतरला. मात्र, अर्धशतक फटकावल्यानंतर लिन लागलीच बाद झाला. यावेळी रसेल फटकेबाजी करत कोलकाताला मोठी धावसंख्या उभारून देईल असे वाटत असताना रसेलने भुवनेश्‍वरच्या षटकात लागोपाठ दोन षटकार ठोकत कोलकाता 150 धावांच्या जवळ पोहोचवले. मात्र, त्याच षटकात आणखीन एक मोठा फटका मारण्याच्या नादात रसेल बाद झाल्याने मोठी धावसंख्या उभारण्याची कोलकाताची आशा धुळीस मिळाली.

संक्षिप्त धावफलक

कोलकाता नाईट रायडर्स – 20 षटकांत 8 बाद 159 (ख्रिस लिन 51, रिंकू सिंग 30, सुनील नारायण 25, खलिल अहमद 3-33) पराभुत विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद 15 षटकांत 1 बाद 161 (जॉनी बेअरस्ट्रो नाबाद 80, डेव्हिड वॉर्नर 67).

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)