मतदारांचा विश्वासघात केल्याचा कॉंग्रेसचा आरोप
नवी दिल्ली – अभिनेते सनी देओल हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गुरूदासपुर मतदार संघातून विजयी झाले आहेत. तथापी आपल्या या मतदार संघात कायम येणे जमणार नाही त्यामुळे आपल्या अनुपस्थितीत हे काम आपण आपल्या प्रतिनिधीकडे सोपवत असून माझ्यावतीने ते सर्व संबंधीत बैठकांना उपस्थित राहतील आणि माझी संसदीय जबाबदारी ते तेथे पार पाडतील असे पत्र त्यांनी त्यांच्या प्रतिनिधीच्या नावाने जारी केले आहे. ही जबाबदारी त्यांनी गुरूप्रितसिंग पल्हेरी यांच्याकडे सोपवले आहे. त्यांच्या नावाचे तसे पत्र त्यांनी जारी केल्याने कॉंग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे. सनी देओल यांनी आपल्या मतदार संघातील नागरीकांचा याद्वारे विश्वासघात केला असल्याची टीका कॉंग्रेस पक्षाने त्यांच्यावर केली आहे.
या संबंधात पंजाबातील कॉंग्रेसचे नेते सुखबीरसिंग रंधवा यांनी म्हटले आहे की लोकांनी सनी यांना निवडून दिले आहे त्यांच्या प्रतिनिधींना नव्हे. त्यांनी स्वत:ची जबाबदारी सोडून असा पळ काढणे योग्य नाही असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान पल्हेरी यांनी या प्रकाराविषयी सारवासारव करताना म्हटले आहे की गुरूदासपुर मतदार संघातील लोकांना त्यांच्यावतीने 24 तास भेटण्यासाठी कोणी तरी प्रतिनिधी असणे आवश्यक असल्याने त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. त्या विषयी फार भांडवल करण्याची गरज नाही. सनी देओल हे मुंबईत राहतात आणि सध्या ते दिल्लीत संसद अधिवेशनाला उपस्थित आहेत. त्यांच्या मतदार संघातील कामांमध्ये लक्ष घालण्यासाठी आणि लोकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी त्यांनी माझी नेमणूक केली आहे असेही त्यांनी म्हटले आहे.