पुणे – मुळा-मुठा नदी संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या “जायका’ प्रकल्पाची आढावा बैठक रद्द करण्यात आली आहे. मंगळवारी दिल्ली येथे ही बैठक बोलविण्यात आली होती. जपानमधील “जायका’ कंपनीच्या माध्यमातून सुमारे 991 कोटींचा नदीसुधार प्रकल्प पालिका राबविणार आहे.
यासाठी केंद्राने 2016 मध्ये मान्यता दिली असली, तरी त्यानंतर या कामासाठी सल्लागार नेमण्यास केंद्र सरकारने सुमारे दीड वर्षे घेतली. त्यामुळे या योजनेचे कामच पुढे सरकले नाही. त्यानंतर केंद्राकडून आतापर्यंत पालिकेस सुमारे 57 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले असले, तरी त्यात केवळ या प्रकल्पासाठी टाकण्यात येणाऱ्या ड्रेनेज लाइनचे कामच हाती घेण्यात आले असून या योजनेअंतर्गत नदीच्या दोन्ही बाजूस बांधण्यात येणाऱ्या 11 सांडपाणी शुद्धीकरण केंद्र तसेच स्वच्छतागृहांच्या कामांच्या अद्याप निविदाच काढल्या जात आहेत.
डिसेंबर 2018 मध्ये केंद्राकडे झालेल्या आढावा बैठकीतच पालिकेच्या या कामाच्या गतीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तसेच, पुढील बैठकीपूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण करून कालमर्यादेत हे काम करण्याच्या सूचना पालिकेस देण्यात आल्या होत्या. मात्र, अजूनही हे काम झालेले नाही. तर “जायका’ कंपनीनेसुद्धा या कामाबाबत तसेच निधी खर्चाबाबत जपान सरकार नाराज असल्याचे पालिकेस कळविले आहे. त्यामुळे आधीच केंद्र शासन तसेच निधी देणारी संस्था पालिकेवर नाराज असतानाच; आता पुन्हा सहा महिन्यांनंतरची आढावा बैठक बोलविण्यात आली होती. त्यासाठी सोमवारी आयुक्तांनी तातडीने आढावा बैठकही घेतली होती.