राजशिष्टाचाराला सुजय विखेंनी फासला हरताळ

झेडपी अध्यक्षांच्या ऍन्टी चेंबरमध्ये त्यांच्या खुर्चीवर बसून अधिकाऱ्यांची बैठक

नगर: नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे यांनी निवडून आल्यानंतर लगेच कामाचा तडाखा सुरू केला आहे. परंतु कामे करतांना मात्र त्यांनी राजशिष्टाचाराला अक्षरशः हरताळच फासला. गुरुवारी दुपारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या ऍन्टी चेंबरमधील त्यांच्या खुर्चीवर बसून त्यांनी जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. अर्थात लोकप्रतिनिधींना जिल्हा परिषदेत बैठक घेण्यासाठी सभागृहासह समिती सभागृह असतांना तेथे बैठक न घेता खा.डॉ. विखे यांनी अध्यक्षांच्या ऍन्टी चेंबरमध्ये बैठक घेतली. तीही थेट अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून घेतल्याने अधिकाऱ्यांसह सभापतींनी नाराजी व्यक्‍त केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खा.डॉ. विखे हे जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांचे सुपुत्र असले तरी राजशिष्टाचाराचे पालन होणे आवश्‍यक आहे. परंतु त्याचा विसर खा. डॉ. विखे यांना पडला असल्याचे दिसून आले. नियोजन समितीच्या बैठकीच्या पार्श्‍वभूमिकवर जिल्हा परिषदेला आवश्‍यक निधी तसेच आगामी विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कामे मार्गी लागावीत या हेतूने खा. डॉ. विखे यांनी आज जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांची एकत्रित बैठक घेतली. अर्थात खासदार म्हणून डॉ. विखे यांना ही बैठक जिल्हा परिषदेतील समिती सभागृहात घेता आली असती. जिल्हा परिषदेत तीन समिती सभागृह आहेत. परंतु तेथे बैठक न घेता त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या ऍन्टी चेंबरमध्ये घेतली. एवढे नाही तर थेट अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, समाजकल्याणचे सभापती उमेश परहर यांच्यासह काही सदस्य व अधिकारी उपस्थित होते.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हे दोन्ही सभापती या बैठकीला उपस्थित असतांना एकानेही डॉ. विखेंना राजशिष्टाचाराचा आठवण करू दिली नाही. त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्र्यांच्या दर्जा आहे. असे असतांना खासदार म्हणून डॉ.विखे यांनी राजशिष्टाचार पाळला पाहिजे होता. असे मत बैठकीला उपस्थित असलेल्यांनी व्यक्‍त केले. अध्यक्षांच्या खुर्चीवर अतिक्रमण करणे योग्य नाही.यापूर्वी देखील असा प्रकार जिल्हा परिषदेत झाला होता.

अध्यक्षांच्या खुर्चीवर माजी लोकप्रतिनिधी बसले असता त्यांना सदस्यांनी उठून लावले होते. ही घटना सन 2003 मध्ये घडली होती. दरम्यान, खा.विखेंनी राजशिष्टाचार न पाळल्याबद्दल प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून वेगवेगळी मते व्यक्‍त करण्यात आली आहे. काहींच्या मते खासदारांना अधिकार आहे. ते बैठक घेवू शकतात. तसेच ते अध्यक्षांच्या खुर्चीवर देखील बसू शकतात. अनेक बैठका या खासदारांच्या अध्यक्षतेखाली होतात. तेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष हे सदस्य म्हणून बैठकीला बसतात. मात्र काही अधिकाऱ्यांच्या मते खासदार व जिल्हा परिषद अध्यक्ष हे दोन्ही लोकप्रतिनिधी वेगळे असल्याने एकमेकांचा आदर करणे आवश्‍यक आहे. त्यानुसार राजशिष्टाचार पाळला जाणे आवश्‍यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)