अधिकाऱ्यांसमोरच आत्मदहनाच्या प्रयत्न

कराड तालुक्‍यातील चिखली येथील प्रकार : पोलिसांची चौघा आंदोलकांवर कारवाई

कराड  – चिखली, ता. कराड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात असणाऱ्या सामाजिक सभागृहाला देण्यात आलेले माजी सरपंच शामराव आबाजी चव्हाण यांचे नाव काढून टाकावे. या मागणीसाठी गत दीड वर्षापासून सुरू असणाऱ्या पाठपुराव्याला यश न आल्याने चौघांनी गुरुवारी पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्यांच्या केबिनमध्येच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामध्ये एका ग्रामपंचायत सदस्यासह तक्रारदार महेश पाटील व अन्य दोघांचा समावेश आहे. पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची घटना घडली असून तालुक्‍यात खळबळ उडाली.

याबाबत अधिक माहिती अशी, चिखली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात बांधण्यात आलेल्या सामाजिक सभागृहास सलग वीस वर्षे सरपंच म्हणून निवडून आलेले शामराव आबाजी चव्हाण यांचे नाव देण्यात आले होते. कोणत्याही प्रकारची मंजूरी न घेता सभागृहास नाव देण्यात आले असल्याचे महेश धर्मेंद्र पाटील यांची तक्रार होती. गत दीड वर्षापासून सामाजिक सभागृहाला देण्यात आलेले नाव काढून टाकण्यात यावे, अशी मागणी ते करत आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत सदस्य बंडोजीराव ज्ञानदेव सावंत यांच्यासह काहींनी या नावाला विरोध दर्शवला आहे. परंतु ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच व अन्य पाच सदस्यांचा हे नाव काढण्यास विरोध केला. काही झाले तरी नाव न काढण्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता.

याबाबत गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांच्याकडे महेश पाटील यांनी अनेकवेळा निवेदने दिली आहेत. गटविकास अधिकाऱ्यांनीही हे नाव कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याने ते काढून टाकण्यात यावे, असे आदेश ग्रामसेवकांना दिले आहे. मात्र त्याची अंमलबजावणी ग्रामसेवकांकडून झाली नसल्याने महेश पाटील यांनी शुक्रवार दि. 22 रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. याबाबतच्या सुनावणीसाठी गुरूवारी गटविकास अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह तक्रारदारांना बोलावले होते. बैठकीस सरपंच वंदना माळी, ग्रामसेवक चंद्रकांत धिंदळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी सभागृहाचे नाव काढावे लागेल असे सदस्यांना सांगितले. मात्र सदस्य नाव न काढण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याने नाराज होत तक्रारदार महेश पाटील यांच्यासह सदस्य बंडोजीराव सावंत, विजय सदाशिव जगताप, बापूराव रामदास जाधव यांनी कार्यालयातच अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
कर्मचाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांना परावृत्त केल्याने अनर्थ टळला. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

सरपंचांना सांगता येईना माहिती

सामाजिक सभागृहास देण्यात आलेले नाव बेकायदेशीर असल्याने ते काढण्यात यावे, या मागणीसाठी गत दीड वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य व तक्रारदार यांच्यात जुगलबंदी सुरू आहे. त्याच्या पाठपुराव्याला यश न आल्याने तक्रारदारांनी गुरूवारी गटविकास अधिकाऱ्यांसमोरच रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. या तक्रारीबाबत सरपंच वंदना माळी यांना माहिती विचारणा केली असता त्यांना काहीच माहिती देता आली नाही. वंदना माळी या गत साडेतीन वर्षापासून सरपंचपद सांभाळीत असतानाही त्यांना याबाबत काहीच माहिती देता न आल्याने सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू होती.

तात्काळ नाव काढण्याच्या सूचना

सामाजिक सभागृहास देण्यात आलेले नाव हे बेकायदेशीर आहे. मंत्रालयाची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही शासकीय इमारतीवर नाव लावता येत नाही. त्यामुळे इमारतीवर लावलेले नाव तात्काळ काढून टाकून तसा अहवाल पंचायत समितीस देण्यात यावा. तसे न झाल्यास होणाऱ्या परिणामास ग्रामपंचायत जबाबदार राहील, अशा लेखी सूचना गटविकास अधिकाऱ्यांनी दिल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)