संगमनेर – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने कायम शेतकरी हिताचेच धोरण घेतले असून ऊसाला उच्चांकी भाव देण्याची परंपरा कायम राखली आहे. सन 2018 – 2019 या हंगामात गळीतास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन 2 हजार 500 रुपये देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष अॅड. माधवराव कानवडे यांनी दिली आहे.
राज्यात सर्वत्र दुष्काळी वातावरण असून शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ऊस हेच एकमेव शाश्वत पीक असून शासनाच्या धरसोडपणामुळे साखर उद्योग मोठ्या संकटात आहे. साखरेचे भाव दिवसेंदिवस कमी होत असतांना अनेक कारखान्यांना एफआरपी देणे सुद्धा अडचणीचे ठरत आहेत.
याचबरोबर कारखाना कार्यक्षेत्रात ऊस उपलब्धता रहावी, यासाठी सन 2018- 2019 या गाळप हंगामात तुटलेल्या ऊसाचा जे शेतकरी खोडवा, निडवा ठेवतील व 1 डिसेंबर 2018 पासून 30 एप्रिल 2019 पर्यंत जे शेतकरी सुरु ऊसाची लागवड करतील त्यांना या हंगामात गळीतास आल्यानंतर 100 रुपये प्रतिटन अनुदान देण्यात येणार आहे. तसेच ठिबक सिंचनावर ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनाही 100 रुपये प्रतिटनप्रमाणे अनुदान मिळणार आहे.
दुष्काळी परिस्थिती, शेतमालाचे पडलेले भाव याचा विचार करता कारखान्यामार्फत कार्यक्षेत्रात ऊस लागवडीसाठी बेणे, रोपे, औषधे देण्याची सुविधा असल्याने शेतकऱ्यांनी शाश्वत उत्पन्न देणाऱ्या ऊसाची लागवड व जोपासणा करुन या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा