साखरेचे भाव वाढण्याची शक्‍यता

नगर – साखरेच्या किमान हमी भावात दोनशे रुपयांनी वाढ करण्याच्या केलेल्या मागणीचा केंद्र सरकार विचार करीत असल्याने किरकोळ बाजारातील साखरेचे भाव वाढण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने किती साखर बाजारात आणायची, याची कोटा सिस्टीम ठरविली आहे. या महिन्यात सुमारे 19 लाख टन साखरेचा कोटा खुला केला. त्यातच निर्यातीची तीन लाख टन साखरही बाजारात विकायला परवानगी देण्यात आली होती. हा महिना गणेशोत्सव, महालक्ष्मी आणि उपासाचा असल्याने साखरेची बाजारात मागणी होती.

नगर जिल्ह्यातील पद्मश्री विखे, गणेश, मुळा, कर्मचारी शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आदी कारखान्यांनी या महिन्यांतील कोटयाची विक्री केली आहे. 2900 रुपयांच्या खाली साखरेची विक्री करायची नाही, असा दंडक केंद्र सरकारने घालून दिला. त्याचा चांगला परिणाम साखरेच्या भावावर झाला. तीन लाख टन जादा साखर खुली होऊनही किमान भावाच्या अटीमुळे साखरेची किमंत जास्तच राहिली. आताही 3065 ते 3140 रुपयांदरम्यान साखर आहे.
साखरेच्या किमान भावात आणखी दोनशे रुपयांनी वाढ करण्याची मागणी साखर उद्योगाने केली आहे. त्याबाबत केंद्र सरकार विचार करीत आहे.

-Ads-

निर्यात अनुदानात वाढ करण्यासाठी आयोजित बैठक अचानक पुढे ढकलण्यात आली. त्याबाबत निर्णय झाला, तर साखरेच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्‍यता साखर उद्योगाचे अभ्यासक व्यक्त करतात. पुढच्या महिन्यात शारदोत्सव आणि दिवाळी असल्याने गोडाधोडासाठी साखरेची मागणी वाढेल. साखरेचा कोटा ही वाढण्याची शक्‍यता आहे. असे असले, तरी साखरेच्या भावात घट होण्याची शक्‍यता नाही. उलट, साखरेच्या भावात वाढ होण्याची शक्‍यता आहे.

पुढच्या आठ महिन्यांत होणारी लोकसभेची निवडणूक, शेतकऱ्यांची एफआरपीची अजूनही थकलेली दहा हजार कोटी रुपयांची रक्कम आणि ग्राहकांची महागाई वाढीविरोधातील भूमिका लक्षात घेता साखरेचे भाव फार वाढणार नाहीत, याची दक्षता जशी केंद्र सरकार घेणार आहे, तशीच दक्षता साखरेच्या भावात घसरण होऊन शेतकरी विरोधात जाणार नाहीत, याचीही घेतली जाईल.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)