यंदा एक महिना अगोदरच ऊस गळीत हंगाम- सुभाष देशमुख

ऑक्‍टोबरमध्येच पेटणार धुराडे 

पुणे: गतवर्षीपेक्षा यंदा उसाच्या क्षेत्रात वाढ झाल्याने साखरेच्या उत्पादनात वाढ होणार आहे. त्यामुळे वेळेत गळीत हंगाम पूर्ण व्हावा यासाठी दरवर्षीपेक्षा एक महिना आधी म्हणजे एक ऑक्‍टोबरपासून गळीत हंगाम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पुण्यात केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यातील गळीत हंगामासंदर्भात साखर कारखान्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी साखर आयुक्‍त संभाजी कडू पाटील, राज्य सहकारी बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, खासदार धनंजय महाडिक, साखर संचालक, सह- संचालक, कारखान्याचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत देशमुख यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, साखर कारखान्याच्या कर्जाबाबत एका समिती तयार करण्यात आली आहे. कारखान्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याबाबत निर्णय समितीकडून घेतला जाईल. जेणेकरून बॅंकेला अडचण येणार नाही. ऊस गाळपही वेळेत सुरू होण्यास मदत होईल.

यावर्षी मुबलक उसाचे गाळप वेळेत होण्यासाठी आजारी साखर कारखाने सुरू करण्यासाठी सरकारने प्राधान्य दिलेले आहे. किमान 10 कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उपलब्ध उसाचे शंभर टक्‍के गाळप होण्यासाठी आम्ही प्राधान्य दिले आहे.मागील वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील गाळप परवाने ऑनलाइन पद्धतीने दिले जातील. तसेच वजन काट्याची तपासणी करण्याकरिता भरारी पथकाची नेमणूक केली जाईल. कोणत्याही कारखान्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये, अशा सूचना ही बैठकीत केल्या असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेमधून ऊस तोडणी यंत्र अनुदान दिले जात होते, ही योजना बंद झालेली आहे. कारखान्यांनी ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी आजच्या बैठकीत केलेली आहे. याबाबत मजुरांच्या टंचाईवर मात करण्यासाठी ऊस तोडणी यंत्र योजना सुरू ठेवण्यासाठी शासनाकडून पाठपुरावा सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

यंदा 195 कारखाने सुरू होण्याची अपेक्षा 

राज्यात यंदा 11.62 लाख हेक्‍टर क्षेत्रावर ऊस आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी ऊस पिकाखालील क्षेत्र 2.66 लाख हेक्‍टरने अधिक राहणार आहे. यावर्षी 195 साखर कारखाने सुरू होण्याची अपेक्षा आहे. 941 लाख टन ऊस गाळपातून चालू वर्षीही 107 लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यात वाढ सुद्धा होण्याची शक्‍यता अधिक आहे. गतवर्षी उसाची हेक्‍टरी उत्पादकता अधिक राहिल्याने साखर उत्पादन अधिक झाले होते. यंदा उत्पादकता कमी राहण्याची शक्‍यता आहे. पण हेक्‍टरी क्षेत्र वाढल्याने उत्पादक गेल्यावर्षीपेक्षा थोडे जास्त होण्याची शक्‍यता आहे.

कारखान्यांनी मागितली मूदत 

गतवर्षीची थकित एफआरपीची रक्‍कम सुमारे 500 ते 550 कोटी रुपयांच्या आसपास आहे. माझ्या स्वतःच्या लोकमंगल कारखान्याची 16 कोटी रुपये थकीत आहे. साखरेचे भाव पडल्याने थकित रक्‍कम देण्यास कारखान्यांनी मुदत मागितली आहे. सर्व कारखाने थकीत रक्‍कम वेळेत देतील, याबाबतच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या असल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)