ऊसतोडणी मजुरांचा राज्यव्यापी संपाचा निर्णय

संग्रहित फोटो

ग्रामविकास मंत्री मुंडेंचा संपाला पाठिंबा ,1 सप्टेंबरला राज्यव्यापी मेळावा

पाथर्डी – ऊसतोड मजुरांच्या मजुरीत शंभर टक्‍के वाढ करावी, मुकादमाचे कमिशन 35 टक्‍के करावे, यासह इतर मागण्यांसाठी राज्यव्यापी संप करण्याचा निर्णय आज झालेल्या ऊसतोड मजूर व मुकादम संघटनेच्या बैठकीत जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे ऊसतोड मजुर, मुकादम विरोधात साखर सम्राट असा संघर्ष सुरू झाला असल्याचे मानले जात आहे.

ऊसतोड मजुरांचे आगार समजल्या जाणाऱ्या पाथर्डी तालुका व बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर संघटनेचे तसेच मुकादम संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक येथील शासकीय विश्रामगृहावर झाली. या बैठकीस ऊसतोड मजुर संघटनेचे राज्यस्तरीय पदाधिकारी माजी आमदार केशव आंधळे, श्रीमंत जायभाय, संजय तिडके, रामदास बडे, ब्रह्माजी दराडे, भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, राहुल कारखेले, दशरथ वणवे, दिनकर पालवे, अशोक चोरमले, संजय किर्तने यांच्यासह मजुर व मुकादम संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आंधळे म्हणाले, ऊसतोड मजुरांना सध्या एक टन ऊस तोडला तर 228 रुपये दिले जातात. मात्र, हेच काम हार्वेस्टर मशीनने केले तर 450 रुपये दिले जातात.हा भेदभाव आता करता येणार नाही.मागील वेळी झालेल्या करारात मुकादमाला 15 टक्‍के कमिशन देण्याचे ठरले होते. मात्र, आता महागाई वाढली असल्याने हे कमिशन 35 टक्‍के करावे. यापूर्वी जो करार केला तो पाच वर्षांसाठी होता. त्याला आता तीनच वर्ष पूर्ण झाली असली तरीही प्रत्येक वस्तूचे भाव या तीन वर्षात किती वाढले ते साखर कारखानदारांनी समजुन घ्यायला हवे. सध्याचे शासन हे आपले शासन असुन आपल्या संपाला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा पाठिंबा आहे. असे ते म्हणाले.

येत्या एक सप्टेंबर रोजी बीड येथे ना. मुंडे यांच्या उपस्थितीत राज्यव्यापी मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात पुढील दिशा ठरवली जाईल. ज्या कारखान्यावर मजूर ऊस तोडायला जातात. त्या ठिकाणी मजुरांच्या राहण्याची सोय करावी, मजुरांना पेन्शन सुरू करावी, अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या. याच बैठकीत मजुर संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. पिराजी किर्तने यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी रामनाथ ढाकणे तर खजिनदार म्हणून विनायक किर्तने यांची निवड करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)