ठिबककडे ऊस उत्पादकांची पाठ

संग्रहित छायाचित्र

राज्य सरकारचा आदेश दुर्लक्षित; कमी व्याजाऐवजी हवे अनुदान

भागा वरखडे

नगर – दुष्काळ आणि कमी पावसाच्या काळातही ऊस जगला पाहिजे आणि ऊस जास्त पाणी पितो, ही टीका ही थांबवली पाहिजे, या भूमिकेतून राज्यात शंभर टक्के ऊस ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचनाखाली आणण्याचा आदेश राज्य सरकारने काढला आहे; परंतु गेल्या वर्षभरात या आदेशाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. एकतर ठिबक सिंचनासाठी येणारा प्रचंड खर्च आणि त्यासाठी मोजाव्या लागणाऱ्या व्याजामुळे आणि बॅंकांच्या तांत्रिक अडचणीमुळे योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करूनही त्याचा फारसा फायदा झाला नाही.

महाराष्ट्र हे उसाच्या उत्पादनात आघाडीवरचे राज्य आहे. महाराष्ट्रातील ऊसशेतीचा अभ्यास करण्यासाठी तमीळनाडूचे शेतकरीही येथे यायला लागले आहेत. उसाच्या बेण्याबाबत आघाडीवर असलेल्या तमीळनाडूच्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अनुकरण करावे वाटावे, यावरून इथे चाललेल्या प्रयोगाचे महत्त्व लक्षात येते. राज्यात सध्या 9.42 लाख हेक्‍टरवर ऊस लागवड आहे. त्यापैकी अवघे दोन लाख 25 हजार हेक्‍टर क्षेत्राला ठिबक करण्यात आले आहे. दर तीन-चार वर्षांनी महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती तयार होते. त्या वेळी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली, की सर्वंच लोक उसावर तुटून पडतात. उसाला फार पाणी लागते, अशी ओरड होते. उसाला दरवर्षी 25 हजार क्‍युबिक मीटर पाणी लागते. केंद्रीय कृषीमूल्य आयोगाने यापूर्वी दिलेल्या अहवालात उसासाठी ठिबक सिंचन सक्तीचे करताना त्यासाठी 75 टक्के अनुदान देण्याची शिफारस केली होती; परंतु सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले.

उसाला प्रवाही पद्धतीने पाणी देण्याऐवजी ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिले, तर पन्नास ते सत्तर टक्के पाण्याची बचत होते. ठिबक सिंचन केल्यानंतर उसाला साडेसात हजार ते साडेबारा हजार क्‍युबिक मीटर पाणी लागणार आहे. त्यातून खते दिली, तर उसाचे उत्पादनही तीस ते चाळीस टक्‍क्‍यांनी वाढते, असा कृषीमूल्य आयोगाचा अहवाल आहे. ऊस उत्पादन खर्चात होत असलेली वाढ आणि त्या तुलनेत उसाच्या भावात झालेली वाढ पाहिली, तर आता शेतकऱ्यांची जादा खर्च करण्याची मानसिकता राहिलेली नाही.

सरकारने तीन वर्षांत उसाचे संपूर्ण क्षेत्र ठिबकखाली करण्याची सक्ती केल्यानंतर कंपन्यांनी ठिबक सिंचन संचाच्या किंमतीत वाढ केली. आता हेक्‍टरी किमान 85 हजार चारशे रुपये खर्च येणार असल्याचे सरकारच मानते. राज्यातील सव्वासात लाख हेक्‍टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याची महत्त्वाकांक्षी योजना सरकारने जाहीर केली. त्यातील तीन लाख सत्तर हजार हेक्‍टर क्षेत्र या वर्षी ठिबक सिंचनाखाली आणायचे होते; परंतु अजूनही कारखाने व शेतकऱ्यांचा या योजनेला प्रतिसाद मिळत नाही. त्याचे कारण योजनेसाठी मोजावे लागणारे व्याज हे आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजनेनुसार राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंक (नाबार्ड) राज्य सहकारी बॅंकेला साडेपाच टक्के दराने कर्ज देईल. राज्य सहकारी बॅंक हे कर्ज जिल्हा बॅंकांना सहा टक्के दराने देणार आहे. जिल्हा बॅंका शेतकऱ्यांना सव्वासात टक्के दराने कर्ज देणार आहे. त्यातील राज्य सरकार चार टक्के व्याजाचा बोजा उचलणार आहे. साखर कारखान्यांनी सव्वा टक्के व्याजाचा तर शेतकऱ्यांनी दोन टक्के व्याजाचा बोजा उचलायचा आहे. राज्य व केंद्र सरकारच्या दुसऱ्या योजनांनुसार ठिबकसाठी 45 व 55 टक्के अनुदान मिळते; परंतु नव्या योजनेत अनुदानाऐवजी व्याजाचा भुर्दंड पडणार असल्याने शेतकरी व कारखानदारांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे समजते.

पूर्तता करायला नको का?

“”नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने दरवर्षाप्रमाणे शेतकऱ्यांना ठिबकसाठी अनुदान दिले आहे. प्रतिसाद नेहमीप्रमाणे आहे. नव्या योजनेसाठी कर्ज द्यायचे राज्य सरकारचे आदेश आहेत. बॅंकांची त्याला ना नाही; परंतु शेतकरी व कारखान्यांच्या अर्जाची, प्रस्तावांची छाननी करावी लागते. त्रुटींची पूर्तता करावी लागते. थकबाकीदार आहे, की नाही, हे पाहावे लागते. बॅंकांना केवळ घाई करून, सक्ती करून होत नाही. शेतकऱ्यांच्या प्रस्तावांची छाननी सुरू आहे.”
-रावसाहेब वर्पे, कार्यकारी संचालक, जिल्हा बॅंक

फॉर्म भरण्यास अल्प प्रतिसाद

“”राज्य सरकारच्या अनुदानाच्या योजनेला नेहमीप्रमाणे शेतकरी अनुकूल आहेत; परंतु कर्जाच्या योजनेला साखर कारखाने व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचाही फारसा प्रतिसाद नाही. नव्या योजनेचे अर्ज अद्यापही भरलेले नाहीत.”
-पंडित लोणारे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, नगर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)