स्वरप्रभू : सुधीर फडके

सुधीर फडके अर्थात बाबूजी हे महाराष्ट्रातील नामांकित संगीतकार व गायक होते. त्यांना त्यांचे चाहते बाबूजी याच नावाने ओळखतात. त्यांनी जवळपास 50 वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. तसेच मराठी सुगम संगीतावरील त्यांचे प्रभूूत्व वादातीत आहे. मराठी मनामनांत आगळं वेगळं स्थान प्राप्त करणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणजे बाबूजी! गायक, संगीतकार तसेच निर्माते अशा अनेक भूमिका पार पाडणारे बाबूजी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे.

ध्येयनिष्ठ, शिस्तप्रिय तसेच सुसंस्कारीत व हळवे व्यक्तिमत्त्व लाभलेले बाबूजी मराठी मनातील ताईतच होते. हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीत मानाचे स्थान प्राप्त केलेल्या बाबूजींना हिंदी चित्रपटसृष्टीतही मागणी होती. मात्र बाबूजी मराठी चित्रपटसृष्टी व संगीत क्षेत्रातच रमले. साधारण परिस्थिती असली तरी आपल्या तत्त्वाला ते कधीच विसरले नाहीत. भावगीत, भक्तीगीत, देशभक्ती गीत, लावणी असे असंख्य शैली प्रकार त्यांनी आपल्या संगीताद्वारे रसिकांना बहाल केले. गदिमांचे सर्वोत्तम गीतरामायणासारखे महाकाव्य अजरामर झाले ते त्यातील सुंदर अर्थपूर्ण शब्दरचना आणि मधुर संगीतामुळेच!

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘गोकुळचा चोर’, ‘आगे बढो’, ‘सीता स्वयंवर’, ‘जीवाचा सखा’ असे अनेक मधुर संगीताने सजलेले चित्रपट त्यांनी सुरुवातीच्या कालखंडात रसिकांना दिले. आपल्या संगीत नियोजनाखाली ललिता फडके, माणिक वर्मा, मालती पांडे, आशा भोसले, लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोरकुमार यासारख्या कलाकारांकडून सुंदर काम करून घेतले.

“संत जनाबाई’, ‘पुढचे पाऊल’, ‘वंशाचा दिवा’, ‘लाखाची गोष्ट’, ‘जोहार मायबाप’, ‘जशास तसे’ आदी चित्रपटातील मधुर गीतांनी श्रोते भारावून गेले. पुणे आकाशवाणीवर दर आठवड्यास एक नवे गीत, असे करत करत एकूण 56 भावपूर्ण व मधुर गीत रामायणाची गीते संगीतबद्ध करून बाबूजींनी जागतिक रेकॉर्ड केले आहे. गदिमांचे शब्दसामर्थ्य आणि बाबूजींचे संगीत यामुळे गीत रामायण खुलले, फुलले, बहरले आणि सुधीर फडके मराठीत मनातील सुवर्णस्वर झाले! एकूण 111 चित्रपटांना त्यांनी संगीतबद्ध केले त्यातील 31 चित्रपट हिंदी होते. “हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटासाठी त्यांना सन 1963 चा राष्ट्रीय उत्कृष्ट चित्रपटाचा सर्वप्रथम पुरस्कार मिळाला. सन 1991 साली “संगीत नाटक अकॅडमीचा’ संगीत पुरस्कार मिळाला. तर सन 2002 साली “सह्याद्री स्वर्णरत्न पुरस्कार’ त्यांना प्राप्त झाला. अतिशय श्रद्धास्थानी असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे स्वप्न त्यांनी मनी बाळगले होते व ते आपल्या ध्येयनिष्ठेने पूर्णत्वाकडे नेले. संगीतक्षेत्रासाठी आपले सारे आयुष्य वाहून घेतलेल्या बाबूजींचे या निमित्ताने स्मरण.

बाबूजींनी शास्त्रीय गायनाचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्या वामनराव पाध्ये यांच्याकडे घेतले. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात 1941 साली एचएमव्ही या संगीत क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेतून केली. 1946 साली ते पुण्याच्या ‘प्रभात चित्र संस्थे’त संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांना संगीत दिले. तसेच अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायनसुद्धा केले. त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च क्षण म्हणजे त्यांनी 1960 च्या दशकात स्वरबद्ध केलेले ‘गदिमां’चे गीत रामायण. गीत रामायणाचे कार्यक्रम तेव्हा रेडियोवर (खपवळर ठरवळे) वर्षभर प्रसारित होत होते. आजही याचे प्रयोग अफाट गर्दी खेचत आहेत.

आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस त्यांनी ‘वीर सावरकर’ या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपटाच्या निर्मितीत लक्ष घातले होते. हा चित्रपट जनतेकडून जमा केलेल्या वर्गणीतून निर्माण करण्यात आला होता. बाबूजींनी पार्श्वगायन केलेला व संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुधीर फडके यांनी अफाट श्रम केले.

– रामेश्वकरी वैशंपायन


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)