70 वर्षीय वृद्धेवर मेंदूची यशस्वी रेडिओ सर्जरी

साताऱ्यातील पहिलीच शस्त्रक्रिया

सातारा –70 वर्षीय वृद्धेवर मेंदूची यशस्वी रेडियोसर्जरी करण्यात आली असून साताऱ्यातील ही अशाप्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया आहे. साताऱ्यातील ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली. 70 वर्षीय श्रीमती चव्हाण (नाव बदलले आहे) यांना पॅपिलरी थायरॉइड कार्सिनोमा असल्याचे निदान काही वर्षांपूर्वी झाले. या आजारावरील उपचार सुरू असताना त्यांच्या मेंदूमध्ये 1.8 सेमी आकाराचा ट्युमर असल्याचेही निदर्शनास आले. हा ट्युमर थायरॉइड भागापासून मेंदूपर्यंत पसरला होता. त्यामुळे तो एक मेटास्टॅटिक पॅपिलरी कार्सिनोमा झाला होता. विस्तृत मूल्यमापनानंतर डॉ. सिद्धेश त्र्यंबके आणि त्याच्या टीमने हा आजार पूर्ण बरा करणारे उपचार करण्याचे ठरवले आणि रेडियोसर्जिकल उपचार करण्याचे नियोजन करण्यात आले. स्टिरिओटॅक्‍टिक रेडियोसर्जरी (एसआरएस) ही अशा प्रकारची एकमेव उपचारपद्धती आहे, ज्यात रेडिएशनचा अधिक प्रमाणातील डोस शरीरातील छोट्याशा भागावर केंद्रीत करण्यात येतो. ही अगदी साहजिक निवड होती. असे असले तरी रुग्णाच्या परिस्थितीचे काळजीपूर्वक मूल्यमापन करणे आवश्‍यक होते. या पद्धतीने उपचार करताना थोडी जरी चूक झाली असती तरी रुग्णाला अर्धांगवायू होण्याची अथवा रुग्ण कोमात जाण्याची शक्‍यता होती.

डॉ. सिद्धेश त्र्यंबके आणि वरिष्ठ फिजिसिस्ट विक्रम राजा यांनी 3-4 दिवस याचे काटेकोर नियोजन केले आणि ही प्रक्रिया अचूकतेने पार पाडली. पॅपिलरी थायरॉइड कॅन्सर (काही वेळा त्याला पॅपिलरी थायरॉइड कार्सिनोमा असेही म्हणतात) हा सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कॅन्सर असून तो पूर्णपणे बरा होण्याची शक्‍यता असते, अशी धारणा आहे.
साताऱ्यातील ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमधील कन्सल्टंट रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सिद्धेश त्र्यंबके म्हणतात, पॅपिलरी थायरॉइड कार्सिनोमा बरा होण्याची शक्‍यता जास्त असते, रुग्ण बऱ्यापैकी चांगल्या परिस्थितीत असतो आणि ट्युमर आकाराने लहान दिसत असल्याने या रुग्णावर हीच प्रक्रिया करणे आम्हाला योग्य वाटले. ही केस अत्यंत किचकट होती, कारण रेडिएशनचा अधिक प्रमाणातील डोस मेंदूतील एका छोट्याशा भागावर म्हणजेच ट्युमरवर केंद्रीत करायचा होता, जेणेकरून सर्जिकल व्यवस्थापनाचा परिणाम साधता आला असता.

एमआरआयमधून मिळालेल्या माहितीचा वापर करून या ट्युमरचे नियंत्रण करण्यासाठी आवश्‍यक असलेला डोस निश्‍चित करण्यात आला आणि सर्वाधिक परिणाम साध्य करण्यासाठी पूर्ण डोस दिला. अत्यंत काटेकोर नियोजन केल्यानंतर माझ्या नेतृत्वाखालील रेडियोथेरपिस्ट व रेडिएशन फिजिसिस्ट यांच्या टीमने हा पूर्ण डोस देऊ केला. अर्ध्या तासाच्या आत पूर्ण डोस ट्युमरपर्यंत पोहोचवायचा होता. यासाठी अनेक कोन बीम सीटी स्कॅन्स (सीबीसीटी) चाचण्या करायच्या होत्या जेणेकरून सुयोग्य डोसची खातरजमा होईल आणि त्यानंतर एका दिवसात ही ट्रीटमेंट करण्यात आली.
कवटीला छेद न देता आणि रक्तस्त्राव होऊ न देता ही शस्त्रक्रिया करण्यात आली आणि शक्ती, जाणीव, वाचा इत्यादी कार्ये नियंत्रित करणाऱ्या मेंदूतील भागांना कोणत्याही प्रकारचे संभाव्य नुकसान टाळण्यात आले. उपचार यशस्वीपणे पार पडले असून रूग्ण चांगल्या स्थितीत असून कोणतेही साईड इफेक्‍ट्‌स झालेले नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)