सुशीलकुमार शिंदे यांचे पदयात्रेद्वारे शक्तिप्रदर्शन ; उमेदवारी अर्ज केला दाखल

सोलापूर: सोलापूर लोकसभेचे कॉंग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पदयात्रेद्वारे शक्तिप्रदर्शन करत सोमवारी रंगपंचमीदिवशी सकाळी आपला उमेदवारी अर्ज भरला. पदयात्रेत पत्नी उज्वला शिंदे, कन्या आमदार प्रणिती शिंदे, ज्येष्ठ कन्या स्मृती शिंदे-पहाडिया यांच्यासह आघाडीतील राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व लिंगायत समाजातील बडे नेते सामील झाले होते.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुशीलकुमारांनी ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांच्यासह कसबा गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चार हुतात्मे, अहिल्यादेवी होळकर, मनपा आवारातील इंदिरा गांधी यांना अभिवादन केले. त्यानंतर सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सुशीलकुमारांचे चार हुतात्मा पुतळा येथे आगमन झाले. त्यानंतर पदयात्रेला सुरुवात झाली .

केवळ वडिलांसाठीच नाही तर कॉंग्रेस पक्ष आणि देशासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत. “मेक आणि फेक’ची ही निवडणूक आहे. आपल्या आयुष्यातील आणि देशाचे अस्तित्व वाचविण्याची ही निवडणूक आहे. देशाला मजबूत करण्यासाठी सर्वांनी कॉंग्रेसला मतदान केले पाहिजे. लोकशाही आणि हुकूमशाही विरोधातली ही निवडणूक असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी सांगितले.

देशात आणि राज्यात भाजप सरकारकडून हुकूमशाही आणण्याचे काम सुरु आहे. देशातील लोकशाही गाडून टाकण्याचे काम भाजपकडून होते आहे. अशी हुकूमशाही आम्ही चालू देणार नाही. आपली लढाई अत्यंत महत्वाची आहे. जात आणि धर्माच्या नावावर मते मागणाऱ्यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवून दिले पाहिजे. त्यामुळे सर्वधर्माच्या कॉंग्रेस पक्षाला निवडून देण्याची गरज असल्याचे मत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. जाती आणि धर्माच्या नावावर सोलापूरकर कधीच मतदान करणार नाहीत. त्यामुळे विजय आपलाच असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)