नवीन रिक्षा परवाना : अर्जदारांची कागदपत्र तपासणी मोहीम
पुणे – नवीन रिक्षा परवान्यासाठी अर्ज केल्यानंतर सन 2020 मधील तारीख मिळालेल्या अर्जदारांची कागदपत्रे तपासणी करण्याची मोहीम प्रादेशिक परिवहन कार्यालयाने हाती घेतली आहे. यानुसार कागदपत्र सादरीकरणाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच दि. 13 रोजी सुमारे 50 जणांकडून कागदपत्रे सादर करण्यात आली होती. नवीन रिक्षा परवान्यासाठी अर्जदारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने तारीख देण्यात येते.
ऑनलाइन पद्धतीने मिळणाऱ्या दिनांकास अर्जदार कागदपत्रे सादर करतात. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये अर्ज दाखल केलेल्या अर्जदारांना थेट पुढील वर्षांतील तारीख मिळत होती. त्यामुळे प्रलंबित अर्जांच्या संख्येमध्ये भर पडत होती. अर्जदारांच्या सोयीसाठी आणि प्रलंबित अर्जांची संख्या कमी करण्यासाठी आरटीओ प्रशासनाकडून या वर्षामध्ये कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे अर्जदारांना दिलासा मिळणार आहे.
या प्रक्रियेमधील पहिला टप्पा दि. 13 ते 17 मे या कालावधीमध्ये पार पडणार आहे. तर मे 2019 पासून जानेवारी 2020 पर्यंत अपॉइंटमेंट मिळालेले अर्जदार जुलैअखेरपर्यंत कागदपत्र सादर करू शकणार आहेत. प्रलंबित अर्जदारांनी या कालावधीमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सकाळी 10.30 ते 12 वाजेपर्यंत कागदपत्रांसह हजर राहण्याचे आवाहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.