पोटभाडेकरू ठेवलेले पथारी परवाने होणार रद्द

महापालिकेकडून तपासणी मोहीम सुरू

पुणे – महापालिकेचा पथारी परवाना घेऊन नंतर ती पथारी हजारो रूपयांना भाडेकराराने देणाऱ्या पथारी व्यवासायिकांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी अशा पथारींची तपासणी मोहीम महापालिकेने सुरू केली असल्याची माहिती पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, शहरात देण्यात आलेल्या पथारी परवान्यांपैकी सुमारे 60 टक्‍के पथारी भाडेकराराने देण्यात आली असल्याची शक्‍यता प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, शहर फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्या अंतर्गत परवानाधारकांना प्रमाणपत्र आणि बारकोड ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. तर हा परवाना देतानाच्या अटी आणि शर्थीनुसार, ज्या व्यक्‍तीस व्यवसायासाठी परवाना दिला आहे, त्याच व्यक्‍तीने आपला परवाना क्रमांक दर्शनीय भागावर लावणे आवश्‍यक असून स्वत: व्यवसाय करणे बंधनकारक आहे. मात्र, महापालिकेचा हा पथारी परवाना घेऊन नंतर अनेकजण पालिकेस पथारीच्या शुल्कापोटी एकदम शुल्क भरून नंतर मनमानी पद्धतीने भाडे आकारून या पथारी इतरांना व्यवसायासाठी देत आहेत. दोन दिवसांपूर्वी स्वारगेट येथील मेट्रो डेपोच्या कामासाठी पालिकेकडून स्वारगेट येथील काही पथारी व्यावसायिकांचे स्थलांतर करण्यात येणर आहे, त्यासाठी या पथारींची माहिती घेण्यासाठी अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांसह, पथक गेले असता, संबधित पथारीचा मालक भलताच असून त्यांच्यांकडून पथारी भाडेकराराने देण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेत अतिक्रमण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

आधी नोटीसा बजाविणार ?
दरम्यान, ज्या पथारी व्यावसायिकांनी आपल्या पथारी भाडेकराराने दिल्या आहेत. त्यांची माहिती संकलित करून आधी त्यांना नोटीसा बजाविण्यात येणार आहेत. तसेच या नोटीसा बजाविताना आणि त्यांची तपासणी करताना या सर्व प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार असल्याचे अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात आले. त्यानुसार, पहिल्या नोटीसमध्ये खुलासा मागविण्यात येणार असून तो असमाधानकारक आढळल्यास दुसरी नोटीस कारवाईची देऊन त्यानंतर त्यांचा परवाना रद्द केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)