पुणे – वकिलाला मारहाण केलेल्या आरोपीच्या गाडीतूनच पोलीस अधिकारी न्यायालयाच्या आवारात दाखल झाल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी न्यायालयात घडला. न्यायालयात खासगी वाहनांना परवानगी नसताना आरोपीची गाडी चक्क न्यायालयाच्या आवारात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी देखील याकडे गांभीर्याने न पाहता ती गाडी आत सोडली. या प्रकारामुळे आवारातील उपस्थित वकिलांनी गाडीला गराडा घातल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
वकील रवी पवार यांना करण्यात आलेल्या मारहाणप्रकरणी अक्षय रानवडे आणि त्याच्या साथीदारांवर पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली होती. बुधवारी त्यावर पुन्हा सुनावणी होणार होती. त्यावेळी पौड पोलीस ठाण्यातील एक पोलीस उपनिरीक्षक आरोपीच्या गाडीतून न्यायालयात आला. ती गाडी थेट न्यायालयाच्या आवारातच शिरली. काही वकिलांनी पोलीस अधिकाऱ्याला गाडीविषयी विचारले असता “माझ्या मित्राची गाडी असल्याचे’ त्या अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, वाहनाच्या क्रमांकाची तपासणी केली असता ती गाडी आरोपी अक्षय रानवडे याच्या वडिलांची असल्याचे समोर आले. त्यामुळे ही गाडी आत आली कशी? याचा जाब वकिलांनी अधिकाऱ्याला विचारला. यावरुन बराचवेळ गोंधळ सुरू होता.