उत्सुकता उपराजधानीत लढतीची

संग्रहित छायाचित्र

नागपूर – नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी तसेच देशाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. या शहराला दुसरी एक ओळख आहे ती म्हणजे संत्रानगरी. सध्याच्या मध्य प्रदेश राज्याची एकेकाळी नागपूर हे राजधानी होते. विदर्भातच नाही तर संपूर्ण मध्य भारताचे मोठे आणि महत्त्वाचे शहर म्हणून नागपूरची ओळख आहे. ज्यावेळी महिला आरक्षणाची कोठे चर्चाही नव्हती त्याकाळी म्हणजे 1951 मध्ये या मतदारसंघातून देशातील पहिली महिला खासदार निवडून आली.

एकेकाळी हिंदी भाषिक राज्याची राजधानी असणाऱ्या नागपुरात हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणावर राहतात. स्थानिक रहिवासी आणि संस्कृतीवर हिंदीचा पगडा आहे. आज नागपूरला राजकीय ओळख आहे ती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे. खुद्द कॉंग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनीही ज्यांचे कौतुक केले अशा नितीन गडकरी यांनी देशभरात कामांचा अक्षरशः झपाटा लावला आहे. आज मोदींच्या मंत्रिमंडळातील ते क्रमांक दोनचे नेते आहेत. मधल्या काळात त्यांच्या नावाची चर्चा थेट पंतप्रधानपदासाठीही होऊ लागली होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य कार्यालय नागपुरात आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेथे दीक्षा घेतली ती दीक्षाभूमीही नागपुरात आहे. नागपूर उपराजधानी असल्याने राज्याचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी येत होते. 2014 मध्ये राज्यात भाजपा-सेना युतीचे सरकार आल्यानंतर गतवर्षी पावसाळी अधिवेशनही नागपुरात झाले.

नागपूरची अर्थव्यवस्था चाकरमानी आणि व्यापारावर आधारलेली आहे. येथे मोठे उद्योग अगदी बोटावर मोजण्याइतपतच आहेत. पण राष्ट्रीय पातळीवर झालेल्या अनेक सर्वेक्षणात नागपूरची गणना वेगाने वाढणाऱ्या शहरात झाली आहे. विशेषतः नितीन गडकरी यांना केंद्रातील मंत्रीपद मिळाल्यानंतर नागपूरचा विकास सुसाट वेगाने सुरू आहे. अलीकडेच तेथे मेट्रोचे आगमनही झाले आहे. याखेरीज गडकरींनी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूरच्या विकासाकडे मुंबईच्या बरोबरीने लक्ष दिले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कर्मभूमी असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात वर्चस्व मात्र कॉंग्रेसचे राहिले आहे. दलित आणि मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात असल्याने नागपूर हा कॉंग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला मानला जातो. 1998, 99, 2004 आणि 2009 असे चार वेळा विलास मुत्तेमवार या मतदारसंघातून लागोपाठ विजयी झाले आहेत. भाजप आणि कॉंग्रेस असे दोन प्रमुख पक्ष नागपूर शहरात आहेत. या दोन्ही पक्षांचे मतदार जवळपास सारखे आहेत. यातील अल्पसंख्याकांची जी मते आहेत ती महत्त्वाची भूमिका निभवतात. साधारण ही मते ज्या बाजूने जातात तो पक्ष विजयी होतो. भाजपाचा उमेदवार निवडून येणार आहे अशी हूल जरी उठवली तरी अल्पसंख्याक मते त्यांच्या विरोधात जातात हा आजवरचा इथला अनुभव आहे.

नागपूर मतदारसंघाच्या फेररचनेनंतर पूर्वी या मतदारसंघाचा भाग असलेला कामठीचा भाग आता रामटेक मतदारसंघाला जोडला गेला आहे. त्यामुळे नागपूरमधील आता सर्व विधानसभा मतदारसंघ शहरी तोंडावळ्याचेच आहेत.

विधानसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबल
नागपूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. नागपूर उत्तरमधून डॉ. मिलिंद माने, नागपूर दक्षिणमधून सुधाकर कोहळे, नागपूर दक्षिण पश्‍चिममधून भाजपचे देवेंद्र फडणवीस, नागपूर मध्यमधून भाजपचे विकास कुंभारे, नागपूर पश्‍चिममधून सुधाकरराव देशमुख आणि नागपूर पूर्वमधून कृष्णा खोपडे हे भाजपाचे आमदार निवडून आलेले आहेत.

मतदानाची स्थिती
2009 मध्ये या मतदारसंघात 17 लाख 38 हजार 232 मतदार होते. यापैकी पुरुष मतदार 9 लाख 3 हजार 688 तर महिला मतदार 8 लाख 35 हजार 232 होते. या मतदारसंघातली जातीनिहाय स्थिती पुढीलप्रमाणे आहे. हिंदू 66 टक्‍के, बौद्ध 20 टक्‍के, मुसीलम 11 टक्‍के, ख्रिश्‍चन/जैन 2.5 टक्‍के आणि इतर 0.5 टक्‍के आहेत.

राजकीय पार्श्‍वभूमी
नागपूरच्या इतिहासात जांबूवंतराव धोटे आणि बनवारीलाल पुरोहित असे दोन माजी खासदार आहेत जे दोन वेळा वेगवेगळ्या पक्षांच्या तिकिटावर निवडून आलेले होते. 1971 साली फॉरवर्ड ब्लॉकच्या तिकिटावर विजयी झालेल्या जांबूवंतराव धोटेंनी 1980 मध्ये कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली. तर 1984 आणि 1989 मध्ये कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकणारे पुरोहित 1996 मध्ये भाजपाच्या कमळ या चिन्हांवर विजयी झाले होते. यानंतर 1998 पासून कॉंग्रेसच्या विलासराव मुत्तेमवार यांनी या लोकसभा मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवली. देशाच्या संसदीय इतिहासामध्ये सात वेळा लोकसभेवर निवडून जाणे सोपे नाही. परंतु विलास मुत्तेमवार यांनी ही किमया साधली. ते तीन वेळा चिमूरमधून आणि लागोपाठ चार वेळा नागपूरमधून विजयी झाले.

1980 मध्ये त्यांना पहिल्यांदा चिमूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली. ते 80,84 आणि 1991 असे तीन वेळा चिमूरमधून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर 1998 पासून ते नागपूरला आले आणि त्यानंतर 1998,1999,2004 आणि 2009 असे चार वेळा नागपुरातून लोकसभेवर निवडून गेले. दरम्यानच्या काळात त्यांचे दिल्लीतील वजन वाढले. अपारंपरिक ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली. 2009 मध्ये मुत्तेमवार यांनी भाजपचे बनवारीलाल पुरोहित यांचा सुमारे 24 हजार मतांनी पराभव केला. बसपाचे उमेदवार माणिकराव वैद्य यांनी एक लाखाच्यावर मते मिळवली. 2009ची निवडणूक मुत्तेमवार जिंकले पण त्यांना मंत्रिपद गमवावे लागले. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे महासचिव केले. परंतु तिथेही त्यांचा फार काळ टिकाव लागला नाही. काही महिन्यातच त्यांना महासचिव पदावरून बाजूला करत निवडणूक प्रचारासंबंधी समितीवर नेमले.

इतका प्रदीर्घ प्रवास करणाऱ्या मुत्तेमवारांना गतवर्षी नितीन गडकरी यांनी तब्बल 2 लाख मतांनी पराभूत करून घरचा रस्ता दाखवला. मुळातच संघाचे स्वयंसेवक आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री राहिलेल्या गडकरी यांचा राजकीय प्रभाव आणि जनसंपर्क दांडगा आहे. सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांचे गडकरींशी जवळचे संबंध आहेत. स्वच्छ आणि पारदर्शक, तरीही गतिमान कार्यशैली हे गडकरींचे वैशिष्ट्य आहे. असे असूनही गतवेळी त्यांना आम आदमी पक्षातर्फे अंजली दमानिया यांनी चॅलेंज केले. पण त्या थेट चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या. त्यांनी गडकरींवर भ्रष्टाचाराचे घणाघाती आरोप करत आपली आक्रमकता दाखवून दिली होती. पण गडकरी हे अपेक्षेप्रमाणे वरचढ ठरले.

यंदाच्या वर्षी त्यांच्या विरोधात नाना पटोले यांना रिंगणात उतरवण्याची चर्चा सुरू आहे. नाना पटोले यांनी 2014 मध्ये भंडारा-गोंदिया मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे क्रमांक दोनचे नेते प्रफुल्ल पटेल यांना पराभूत करून दिल्ली गाठली. पण काही महिन्यांपूर्वीच त्यांनी पक्षनेतृत्वाविषयी आणि भाजपाच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी दर्शवत पक्ष सोडला आणि कॉंग्रेसवासी झाले. यानंतर संपूर्ण विदर्भात त्यांनी भाजपाविरोधी प्रचार सुरू केला आहे. यशवंत सिन्हांच्या जोडीने त्यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्यपद्धतीवर सणकून टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. नानांनी पक्ष सोडल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भंडारा-गोंदियातून राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांना तिकिट देण्यात आले. त्यावेळी नानांनी त्यांच्या बाजूने सर्व शक्‍ती लावत त्यांना विजयी केले. भाजपासाठी हा मोठा धक्‍का मानला गेला. आता नाना थेट गडकरींना आव्हान देण्यासाठी सज्ज झाल्याची चर्चा आहे. तथापि, गडकरींचा झंझावात आणि या मतदारसंघातील अक्षरशः घराघरात पोहोचलेली त्यांची प्रतिमा पाहता आता लक्ष असेल ते गडकरी किती फरकाने जिंकतात याकडे !

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)