शिक्षणासाठी विद्यार्थी पुन्हा ‘माहेरी’

जिल्हा परिषदांच्या शाळांतील पटसंख्येचा आलेख उंचावला : 94 हजार विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

– डॉ. राजू गुरव

पुणे – राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या विविध शाळांमधील 94 हजार 171 विद्यार्थी शिक्षणासाठी जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे जिल्हा परिषदांच्या शाळांमधील पटसंख्येचा आलेख उंचावला असून शासनाच्या शालेय शिक्षण विभागासाठी ही आनंदाची व अभिमानाची बाब ठरली आहे.

राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याअंतर्गत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्या प्राधिकरण) वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सन 2018-19 या एकाच वर्षात खासगी शाळांमधील बहुसंख्य विद्यार्थी त्या-त्या ठिकाणच्या जिल्हा परिषदांच्या शाळांकडे आकर्षित झाले आहेत. यामुळे जिल्हा परिषदांच्या शाळांमधील पटसंख्या झपाट्याने वाढण्यास खूप मदत झाली आहे.

राज्यातील सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील खासगी शाळांमधील 7 हजार 51 विद्यार्थ्यांनी तर सर्वांत कमी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 454 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. पुणे, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, बीड, जालना या आठ जिल्ह्यांमध्ये चार हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी जिल्हा परिषद शाळामध्ये दाखल झाले आहेत.

इयत्तेनुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी संख्येचा विचार करता इयत्ता दुसरीच्या वर्गात सर्वाधिक 20 हजार 600 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. तर सर्वात कमी नववीच्या वर्गात 2 हजार 200 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. इयत्ता तिसरीच्या वर्गात 20 हजार 592, चौथीच्या वर्गात 18 हजार 61, पाचवीच्या वर्गात 8 हजार 563, सहावीच्या वर्गात 11 हजार 541, सातवीच्या वर्गात 10 हजार 78, आठवीच्या वर्गात 3 हजार 130 याप्रमाणे विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विविध उपक्रमांमुळेच पटसंख्या वाढतेय
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये गेल्या काही वर्षांपासून अध्यायन अध्यापन प्रक्रिया अधिक आनंददायी व सुलभ होण्यासाठी नवोपक्रम राबविण्यात येतात. यामुळे शाळांमध्ये उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व साहित्यांचे वाटप केले जाते. दर्जेदार शिक्षण, आदर्श शिक्षक, विद्यार्थ्यांविषयी असलेली आपुलकी यामुळे जिल्हा परिषदांच्या शाळांकडे खासगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा ओढा वाढू लागला आहे. राज्यातील बहुसंख्य जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये गेल्या वर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे नव्याने प्रवेश झाले आहेत, अशी माहिती विद्या प्राधिकरणाचे उपसंचालक विकास गरड यांनी दिली आहे.

चित्र पालटले
विविध ठिकाणांच्या जिल्ह्यांमध्ये खासगी व्यवस्थापनाच्या शाळांची संख्या गेल्या काही वर्षांपासून खूप वाढल्याचे चित्र पहायला मिळते आहे. राजकीय पुढारी, व्यापारी, उद्योजक, संघटना यांनीच प्रामुख्याने या शाळा सुरू केल्या आहेत हे उघड आहे. या शाळा विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी वसूल करत असतात. यातील बहुसंख्य शाळांमध्ये फारशा भौतिक सुविधाही उपलब्ध नाहीत. त्यामुळे या खासगी शाळांमधील विद्यार्थी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ लागले असल्याचे चित्र गेल्या वर्षापासून पहायला मिळू लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)