साद-पडसाद: “विद्यार्थी’ हा “ग्राहक’ही आहे!

जयेश राणे

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या विद्यार्थ्यांनी वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या साहाय्याने ‘ग्राहक’ म्हणून न्याय पालिकेकडे दाद मागण्यास आरंभ केल्यास आणि ‘विद्यार्थ्यांना आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून देण्यात कुचराई केल्यास कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागू शकते,’ याचे शिक्षण व्यवस्थेला स्मरण राहील. ‘जागो ग्राहक जागो’ याविषयीची अनेक विज्ञापने सरकारकडून सतत प्रसिद्ध होत असतात. केवळ वस्तूतील फसवणुकीविषयी तक्रार करण्यासाठी जागे न होता विद्यार्थ्यांनी त्यांची शैक्षणिक क्षेत्रात जी फसवणूक होत असेल त्या विरोधात ग्राहक म्हणून कायदेशीर पावले उचलली पाहिजे.

मुंबईतील एका इंटरनॅशनल शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसू देण्यास शाळा व्यवस्थापनाने मनाई केली होती. त्याविरोधात त्या विद्यार्थ्याच्या आईने मुंबई उपनगर जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, “विद्यार्थ्याला ग्राहक म्हणून ग्राह्य धरता येणार नाही,’ असे स्पष्ट करत जिल्हा ग्राहक मंचाने ती तक्रार फेटाळली. त्याविरोधात आईने राज्य ग्राहक आयोगासमोर अपील केले होते. त्यावरील सुनावणी अंती खंडपीठाने “विद्यार्थी हा ग्राहकच ठरतो’, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा नुकताच दिला. गैरव्यवहाराला आळा घालण्याच्या दृष्टीने विद्यापीठ अनुदान आयोगाने केलेल्या नियमांवर कार्यवाही करण्यात शैक्षणिक संस्था अपयशी ठरल्याच्या प्रकरणांत राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग, तसेच सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांला “ग्राहक’ म्हणून स्वीकारलेले आहे. या प्रकरणातही संबंधित विद्यार्थ्यांला “ग्राहक म्हणून तक्रार करण्याचा, दाद मागण्याचा अधिकार आहे’, असा निकाल आयोगाने दिला. तसेच “त्या शाळेने आपल्या सेवेत काही कुचराई केली आहे का किंवा गैरवाजवी किंवा अव्यावसायिक प्रकारची कृत्ये केली आहेत का?’ हे पडताळून तक्रारीवर योग्य तो निर्णय द्यावा, असे निर्देश जिल्हा ग्राहक मंचाला देऊन खंडपीठाने हा विषय पुन्हा जिल्हा मंचाकडे पाठवला.

-Ads-

या निकालामुळे एखाद्या शाळा-महाविद्यालयाने किंवा शिक्षण संस्थेने संलग्नतेविषयी खोटा दावा केला. विद्यापीठ अनुदान आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही, उपलब्ध पायाभूत सुविधांविषयी खोटे दावे केले, शिक्षणसेवेत कुचराई करणारी कृत्ये केली किंवा फसवणूक केली, तर विद्यार्थी ग्राहक आयोगाकडे दाद मागू शकत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर, देशातील शिक्षण पद्धतीचा मागोवा घेणे क्रमप्राप्त ठरते.

भारतामध्ये पदवीधर म्हणजेच सुशिक्षित बेरोजगारांची संख्या प्रचंड आहे. त्यांच्याकडे नोकरी-व्यवसाय यांच्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या कौशल्य गुणांचा अभाव, हे यामागील मुख्य कारण आहे. या कारणाची काहीशी सुरवात कुठून होत असेल हे पाहू या. इयत्ता दहावीनंतर विद्यार्थी विज्ञान, वाणिज्य, कला, तंत्रज्ञानाच्या दृष्टीने डिप्लोमा, आयटीआय आदी क्षेत्र निवडतात. इयत्ता बारावीनंतर भविष्यातील करिअरच्या अनुषंगाने व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. सर्वांनाच नामांकित महाविद्यालये, विद्यापीठ येथे प्रवेश मिळत नाही. तरीही विद्यार्थी उत्तमात उत्तम महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी धडपडत असतात. विद्यार्थ्यांना मार्केटमधील मागणीनुसार कौशल्यनिपुण करण्यासाठी संबंधित शिक्षण संस्थेने आवश्‍यक तेवढे सहकार्य करायचे असते. कारण या विश्‍वासावरच विद्यार्थी तेथे प्रवेश घेत असतात. पण ते सहकार्य किती प्रमाणात मिळते? याची उत्तरे संस्थेगणिक निराळी आहेत. लेक्‍चरमधील थेअरीच्या ज्ञानाला प्रॅक्‍टीकल ज्ञानाचीही जोड असणे निकडीचे असते.

यामुळे कृतीप्रवण होण्यासाठी विद्यार्थ्याच्या मनात विचार चालू होऊन शिक्षणाची अधिक गोडी वाटू लागते. या प्रकारे घेतलेले शिक्षण विद्यार्थ्याच्या लक्षात तर राहतेच शिवाय त्याचा आत्मविश्‍वासही वाढतो. नेमक्‍या याच पद्धतीच्या शिक्षणाची उणीव देशात भासत राहिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्याकडे ज्या शाखेची पदवी आहे त्यात तो मार्केटच्या मागणीच्या कसोटीवर खरा उतरेल की नाही, या संदर्भात साशंकता असल्याने येथे बेरोजगारांची संख्या प्रतिवर्षी फुगत चालली आहे. साचेबद्ध शिक्षण कधीच विद्यार्थी घडवू शकत नाही. हे शिक्षण मंडळ, विद्यापीठे यांनी प्रामुख्याने लक्षात घेतले पाहिजे. विविध क्षेत्रातील शिक्षण संस्थांकडे आवश्‍यक तेवढी शैक्षणिक सामग्री नसते, दर्जेदार शिक्षक वर्ग नसतो, लायब्ररीत आवश्‍यक पुस्तकांची वाणवा असते आदी स्वरूपातील बिकट स्थितीला विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागल्यावर मार्केटमध्ये तोंडघशी पडण्याची पाळी येते आणि अकुशल उमेदवार म्हणून शिक्का बसतो. मेहनती, प्रामाणिक विद्यार्थ्याची ही फसवणूकच नाही का? याची सल त्याला कायम बोचत असते. देशामध्ये अभियांत्रिकी शाखेची धूळधाण उडण्यास अशा गोष्टी मुख्यत्वेकरून कारणीभूत आहेत. त्यामुळेच अभियांत्रिकीकडे जाणाऱ्यांचा ओढा पुष्कळ प्रमाणात अल्प झाला आहे. भविष्यात तो अत्यल्प होईल यात शंका नाही. ज्यांना केवळ पदवी प्राप्त करायची आहे, ते याला अपवाद आहेत. त्यांना कितीही गोष्टी उपलब्ध करून दिल्या तरी त्याचा अपेक्षित असा उपयोग त्यांच्याकडून होत नाही.

शिक्षणासाठी आवश्‍यक असलेली गोष्ट मिळण्यासाठी विद्यार्थी-पालक यांनी शिक्षण संस्थांचा पाठपुरावा सातत्याने करणे अनिवार्य आहे. फी भरणे, आपले पाल्य नियमित लेक्‍चरला उपस्थित राहात आहे का, त्याची वर्तणूक नीट आहे का, आदी सूत्रांकडे पालक साधारणपणे लक्ष ठेवत असतात. पण आपल्या पाल्याला ज्या शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला आहे तेथे त्याला अभ्यासासाठी पूरक सुविधा मिळत आहेत का, याकडे नोकरी-व्यवसाय यांत व्यस्त असल्यामुळे त्यांना लक्ष देता येत नाही. आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी व्यस्ततेतून किती वेळ देऊ शकतो, याकडे पालकांनी प्रथम लक्ष देणे अत्यंत आवश्‍यक आहे. अन्यथा अकुशल पदवीधरांच्या फौजा निघतच राहणार. शिक्षण संस्थांवर सरकारच्या नंतर पालकांचा अंकुश हा असलाच पाहिजे.

पालक-विद्यार्थी अशा गोष्टींसाठी घाबरतात यासाठी ते पुढे येत नाही. अत्यंत दुर्मिळ पालक खटकणाऱ्या, नियमबाह्य गोष्टींविषयी शिक्षण संस्थेच्या विरोधात जाऊन न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचे धाडसी कार्य करतात. शिक्षण क्षेत्रात सुधारणा होण्यासाठी असे धाडस केलेच पाहिजे. लोकशाहीने दिलेला तो न्याय्य अधिकार आहे. याचा उपयोग न करता केवळ व्यवस्थेकडे बोट दाखवून बोट मोडत राहणारे काय उपयोगाचे? एकाच्या धाडसी कृतीमुळे अनेकांच्या हृदयाची धडधड वाढते. म्हणजे मनमानी कारभाराला 100% अटकाव घालता आला नाही, तरी अंशतः चाप बसतो. हेही नसे थोडके. यामुळे न्यायालयाकडून कायदेशीर निर्वाळा मिळतोच, तसेच कुठे काय चालू आहे याची सर्वांना माहिती मिळते.
सध्या युवकांकडून सोशल मीडियावर विविध अडचणी मांडल्या जात आहेत. म्हणून विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या मांडण्यासाठीही सोशल मीडिया वापरणे गरजेचे आहे. त्यासह पोलीस, न्यायालय यांचेही दरवाजे ठोठावले पाहिजे. त्यामुळे कायद्याच्या चक्षूतून त्या घटनेचा काय अर्थबोध होतो हे कळते. त्यामुळे न्याय मिळणेही
सुलभ जाते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)