पुणे – हवाई दलाची मोहीम शत्रूंसाठी कडक संदेश

एअर चिफ मार्शल भूषण गोखले (निवृत्त)

पुणे – भारतीय वायुदलाच्या मिराज या लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये केलेल्या कारवाईचा मला अतिशय आनंद झालेला आहे. पुलवामामध्ये झालेल्या भ्याड आत्मघातकी हल्ल्यानंतर पाकिस्तानला कठोर प्रत्युत्तर देण्याची गरज होती. या हल्ल्याची जबाबदारी मसूद अझहरच्या जैश ए मोहम्मदने घेतली होती. अझहरसह जैशचे अनेक कमांडर आणि त्यांची प्रशिक्षण तळे पाकिस्तानात असल्याची माहिती पुढे आली होती. तसेच पुलवामाच्या हल्यानंतर जैश आणखीही भीषण हल्ले करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती. त्यामुळे हा भारताने स्वसंरक्षणासाठी ही कारवाई केलेली आहे. आमच्या सुरक्षेला कोणी बाधा आणत असेल तर त्याची गय केली जाणार नाही, त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल हे आजच्या कारवाईतून भारताने दाखवून दिले आहे. या कारवाईसाठी वायुदलाचीच गरज होती. कारण पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये इतक्‍या आतमध्ये जमिनीमार्गाने घुसून कारवाई करून सुखरुप-सुरक्षित परत येणे हे अत्यंत धाडसाचे आणि जोखमीचे आहे. त्यामुळेच हे तळ नेस्तनाबूत करण्यासाठी हवाई हल्ल्यांचाच पर्याय योग्य होता आणि भारतीय वायुदलाने ही मोहीम यशस्वी करून दाखवली, ही बाब निश्‍चितच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. अशा प्रकारचे हल्ले यशस्वी होण्यामध्ये गुप्तचर माहिती अचूक असणे आवश्‍यक असते. अन्यथा हल्ल्याची योजना पूर्णपणे असफल होण्याचा धोका असतो. त्यामुळे गेल्या 12 दिवसांमध्ये उपग्रहांकडून मिळणारी माहिती, दहशतवाद्यांच्या हालचाली, त्या तळांवरील दारुगोळ्याची स्थिती, पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली आदी सर्व प्रकारची माहिती मिळवली गेली असणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तान काय करणार याकडे आता साऱ्यांचे लक्ष आहे. अर्थात पाकिस्तानने कोणतेही पाऊल उचलले तरी त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास भारत पूर्णपणाने तयार आहे. उलटपक्षी पाकिस्तानकडेच आज युद्धाची क्षमता आहे का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. हा प्रश्‍न दुसऱ्या कुणी नाही तर खुद्द जनरल परवेझ मुशर्रफ यांनीच विचारला आहे. तसेच पाकिस्तानने दोन अणुबॉम्ब टाकल्यास भारत 20 अणुबॉम्ब टाकेल आणि पाकिस्तान बेचिराख होईल असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तानने आता आपल्या छुप्या कुरापती सोडून द्यायला हव्यात. किंबहुना हाच संदेश आपण दिला आहे. आपले लक्ष्य स्पष्ट आहे. आपल्याला दहशतवाद्यांना टिपायचे आहे. पाकिस्तानी सामान्य नागरिकांना इजा करण्यात आपल्याला कोणताही रस नाही.

हवाई हल्लाच का?
पुलवामा हल्ला झाल्यानंतर मोठी ऍक्‍शन भारताने घेतली याचा मला अतिशय आनंद झाला. भारतीय वायूसेनेने आपल्या “नभः स्पृशं दीप्तम’ या ब्रीद वाक्‍यप्रमाणे काम केले. पुलवामा हल्ल्यानंतर सर्व भारतीयांचेच रक्‍त सळसळले होते. केवळ सैन्यदलातील जवानांचेच नव्हे तर सामान्य जनतेचीही ही विचारणा होती की, आपण किती काळ असे हल्ले सहन करत राहायचे? याला चोख प्रत्युत्तर द्यायलाच हवे अशी मागणीही होत होती. तथापि, आततायीपणाने कारवाई करणे चुकीचे ठरले असते. त्यासाठी ऍक्‍शनेबल इंटेलिजन्ससोबतच कारवाईची सर्व तयारीही गरजेची होती. या गोष्टी नसतील तर थोडा वेळ घेणे हिताचे ठरते. तसेच प्रत्युत्तर कसे द्यायचे याचे पर्याय पडताळून रणनीती ठरवावी लागते. जमिनीवरुन हल्ला करायचा की एरियल हल्ला करायचा हे ठरवणे गरजेचे होते. अर्थातच कुठलीही गोपनीय गोष्ट करताना अनेक व्यवधानं पाळावी लागतात. त्यानुसार योग्य नियोजन करून ही कारवाई केली आहे.

यासाठी हवाई हल्ल्याचा मार्ग निवडला ते योग्यच झाले. कारण हवाई हल्ल्यांमध्ये लवचिकतेला संधी असते. आज संगणकाच्या माध्यमातून, गुगल मॅप्ससारख्या प्रणालीच्या माध्यमातून सर्व माहिती क्षणार्धात उपलब्ध होताना आपण पहात आहोत. तशाच प्रकारच्या अत्याधुनिक प्रणालींच्या आधारे हवाई कारवाई करताना प्राथमिक लक्ष्य, दुय्यम लक्ष्य अशा प्रकारे लक्ष्यनिर्धारण करता येते. तसेच आयत्या वेळी लक्ष्य बदलताही येते. तसेच हवाई हल्ल्यातील लक्ष्याची अचूकताही अधिक असते. त्यामुळे विशिष्ट भागालाच लक्ष्य करून त्यावर हल्ला करता येतो. अर्थातच हल्ला करण्याचे ठिकाण निर्धारित करताना तेथील स्थितीविषयीची पक्‍की माहिती असणे गरजेचे होते. तेथे दहशतवादी आहेत, दारुगोळा आहे की सामान्य नागरीक आहेत हे पाहणे आवश्‍यक होते. कारण पाकिस्तानमधील सर्वसामान्य नागरिकांविषयी आपल्याला रोष नाही. आपले लक्ष्य आहेत दहशतवादी. त्यातही यावेळी जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांना आपल्याला लक्ष्य करायचे होते. त्यांना ठार मारल्यामुळे सफलता सर्वाधिक आहे.

– अनिल टिपणीस, एअर चिफ मार्शल, निवृत्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)