आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा ः जिल्ह्यात चार हजार जणांना कायदेशीर प्रतिबंध
सातारा –
निवडणूक काळात आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिला आहे. त्याचबरोबर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आदी उपस्थित होते.

सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणूकीची अधिसूचना दि. 28 मार्च रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 4 एप्रिल तर अर्जांची छाननी 5 एप्रिल रोजी होणार आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 8 एप्रिल असून दि.23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी दि.23 मे रोजी साताऱ्यात होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. आचारसंहितेच्या अनुषंगाने सर्व शासकीय मालमत्तांवरील लेखन, पोस्टर्स, बॅनर्स, कटआऊट, होर्डिंग काढण्यात येत आहेत. त्याचबरोबर निवडणूक कालावधीत शासनाच्या वेबसाईटवरील मंत्र्यांची छायाचित्रे काढण्यात येणार आहेत. दरम्यान, प्रत्येक सभांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.

सभांमध्ये अडथळा, विरोधकांचे पोस्टर्स फाडणाऱ्यांवर आणि मतदारांवर जबरदस्ती करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच प्रसिध्दी माध्यमांनी देखील सर्व उमेदवारांच्या वृत्तांना समान प्रसिध्दी देणे बंधनकारक आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 4 हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. गुन्ह्याचे स्वरूप पाहून एमपीडीए, हद्दपारी अशा कारवाया केल्या जाणार असल्याचे पोलीस अधिक्षकांनी सांगितले. त्याचप्रमाणे निवडणूक काळात अवैध व्यवसायिकांव्दारे बळाचा वापर होत असतो, हे ओळखून त्यांच्यावर कठोर कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात 38 भरारी पथके तयार करण्यात आली आहेत तसेच राखीव भरारी पथके ठेवण्यात आली आहेत, असे ही त्यांनी सांगितले.

उमेदवार व मतदारांसाठी मोबाईल ऍप्लिकेशन

निवडणूक आयोगाने उमेदवार व मतदारांसाठी मोबाईल ऍप्लिकेशन निर्माण केले आहेत. मतदारांसाठी सीव्हीजीएल हे ऍप्लिकेशन निर्माण केले आहे. निवडणूक काळात कायद्याचा भंग होताना निदर्शनास येताच मतदारांनी छायाचित्र व माहिती त्या ऍप्लिेकशवर पाठविल्यास शंभर मिनीटींच्या आत कारवाई करण्यात येणार आहे. तसेच केलेल्या कारवाईची माहिती त्या नागरिकाला देण्यात येणार आहे. तर उमेदवारांना विविध परवानग्या घेण्यासाठी सुविधा नावाचे ऍप्लिकेशन तयार केले आहे. ऍप्लिकेशनव्दारे अर्ज करताच 24 तासांच्या आत परवाना मिळणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)