ताणतणाव चांगला की वाईट ?

-रमेश दिघे

ताणतणाव वाढण्याचं महत्त्वाचं कारण आहे आजची जीवनशैली. अस्तित्व टिकवून धरण्यासाठी सगळीकडे चाललेली स्पर्धा. ही दिवसेंदिवस इतकी भयंकर होत चालली आहे की, जी आपल्या शरीराला आणि मेंदूलाही झेपत नाही. त्यामुळे तणाव वाढतो. तणाव वाढल्यामुळे मनाची चंचलता वाढते. मन अस्थिर होतं. त्यासाठी प्रत्येकाने आपली कुवत ओळखून, आपल्याला झेपेल, जमेल इतकं काम मनाचं संतुलन न ढळता केलं पाहिजे. त्याविषयी मार्गदर्शन करत आहेत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. क्रांती कदम.

तणाव कुणाला चुकलेला नाही. पण वंशपरंपरेसारखं एका पिढीतून पुढच्या पिढीकडे ताण-तणावाचं हस्तांतरण होत आहे. हे गंभीर आहे. एक पिढी दुस-या पिढीला तणाव देत आहे. तणाव वाढण्याच्या अनेक कारणांपैकी हे एक महत्त्वाचं कारण आहे. या संदर्भात तारे जमींपर या चित्रपटाचा उदाहरणादाखल उल्लेख करणं अगत्याचं होईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्या मुलाने डॉक्‍टर किंवा इंजिनीअर व्हावं, खो-याने पैसा कमवावा, समाजातील तथाकथित प्रतिष्ठा जपावी, अशी चारचौघांसारखी तारे..मधल्या छोटया नायकाच्या इशानफच्या आई-वडिलांची इच्छा असते. पण इशान डिस्लेक्‍सिया या आजाराने ग्रस्त असतो. त्याच्या अंगभूत गुणांकडे, दुर्बलतेकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे इशानला विविध प्रकारच्या तणावांना समोरं जावं लागतं. सुदैवाने इशानला निकुंभसरांसारखा मार्गदर्शक लाभतो.

तो इशानची व्यथा जाणतो. त्याला त्यातून बाहेर काढतो. मात्र समाजात प्रत्येक ठिकाणी निकुंभ सरांसारखा मार्गदर्शक लाभत नाही. त्यामुळे तणावाचं जाळं अधिकाधिक घट्ट होत जातं. या चक्राव्यूहात लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सारे जण गुरफटलेले आहेत.

मुळामध्ये नव्या जीवनशैलीनुसार प्रचंड स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेमुळे तणावाचं साम्राज्य दरक्षणी वाढत आहे. या तणावात फक्‍त लहान मुलं, शाळा-कॉलेज-एखादा नवीन अभ्यासक्रम शिकणारी मुलं, नोकरदार वर्ग नाही तर गृहिणीही गुरफटल्या आहेत. वाढती प्रलोभनं हेही तणाव वाढण्याचं महत्त्वाचं कारण ठरत आहे. अशा वाढत्या ताणतणावामुळे मन अस्थिर बनतं.

समर्थ रामदास स्वामींनी मनाचं वर्णन अचपळ मन माझे। धावरे धाव घेता..अशा शब्दात अचूकपणे केलेलं आहे. क्षणार्धात मैलोन्‌ मैल धाव घेणा-या मनाला लगाम नाही घातला तर मानसिक स्वास्थ्य बिघडतं. शारीरिक व्याधी जडतात. उच्च रक्तदाब, हृदयरोग, विविध प्रकारच्या गायनॅक समस्या याही मानसिक संतुलन बिघडल्यामुळे जडतात.

मुंबई ही आता मधुमेहींची नगरी समजली जाते. आणि मुख्य म्हणजे मधुमेहाचा आजार तणावामुळे बळावत आहे, असंही काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. पोटाचे विकारही तणावामुळे वाढत आहेत. एकंदरीत जीवनाच्या प्रत्येक क्षणाला लोकं तणावाचा सामना करतात. पण त्याकडे समजून दुर्लक्ष केलं जातं.

ताणतणाव चांगला की वाईट (भाग 2)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)