कामगार संपाच्या दुसऱ्या दिवशी काही राज्यांमध्ये तणाव

पश्‍चिम बंगाल आणि केरळमध्ये रेल्वे रोखा आंदोलन, दगडफेक

नवी दिल्ली: कामगार संघटनांनी पुकारलेल्या “भारत बंद’ च्या दुसऱ्या दिवशी पश्‍चिम बंगाल आणि केरळमध्ये हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या. तसेच रस्ते आणि रेल्वे रोखण्याच्या काही घटनाही काही राज्यांमध्ये घडल्या. कामगार संघटनांच्या संपामुळे देशभरातील बॅंका आणि विमा कंपन्यांचे कामकाज अंशतः विस्कळीत झाले. याशिवाय खाण उद्योग, रस्ते वाहतुक, वीज पुरवठाही खंडीत होण्याच्या घटनाही देशभरातील काही ठिकाणी घडल्या. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणे आणि एकतर्फी सुधारणा प्रक्रियांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय मजदूर संघ वगळता देशभरातील 10 प्रमुख कामगार संघटनांनी 8 आणि 9 जानेवारीला हा संप पुकारला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पश्‍चिम बंगालमध्ये काही ठिकाणी हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या. हावडा जिल्ह्यात एका स्कूल बसवर दगडफेक करण्यात आली. अशाच प्रकारची घटना कालही झाली होती. पश्‍चिम बंगालमधील अन्य शहरांमध्येही अशाच घटना घडल्या. केरळमध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या तिरुवनंतपुरम येथील शाखेवर हल्ला करण्यात आला. तर ठिकठिकाणी रेल्वे रोखण्याचाही प्रकार घडला. केरळमध्ये अनेक ठिकाणी दुकाने आणि व्यवसायिक ठिकाणे बंद राहिली. बस आणि रिक्षाही रस्त्यावर नव्हत्या. तामिळनाडूमध्येही रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. तेलंगणमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील काही बॅंकांचे कामकाज बंद पाडण्यात आले. मात्र या व्यतिरिक्‍त अन्य सार्वजनिक व्यवहारांवर कोणताही परिणाम झाला नाही.

गोव्यातही आंदोलकांनी खासगी बसवर दगडफेक केली. त्यामुळे पर्यटकांसाठीच्या टॅक्‍सीसेवाही बंद राहिली. अनेक बस स्थानकांवर पर्यटक, प्रवाशांची मोठी गर्दी खोळंबून राहिली होती. मुंबईमध्ये “बेस्ट’कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा फटका लाखो प्रवाशांना बसला. बेंगळूरुमध्येही वाहतुक सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना खूप त्रास झाला. आंदोलकांकडून बसचे नुकसान झाल्यामुळे कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बससेवाही आज बंद होती.

अशोकनगरमधील सेलदाह जवळ रेल्वेमार्गावर बॉम्बसदृश्‍य वस्तू आढळली. ओडिशामध्येही रेल्वे रोखण्याचे प्रकार झाले. त्यामुळे लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या उशीराने धावत होत्या.

“ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन’ आणि “बॅंक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया’ या दोन्ही प्रमुख संघटनांनी संपाला पाठिंबा दिला असल्यामुळे बॅंक व्यवहारांवर परिणाम झाला. मात्र “एसबीआय’ आणि खासगी क्षेत्रातील बॅंकांच्या व्यवहारांवर संपामुळे कोणताही परिणाम झाला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)