ताण-तणाव

रोज पेपर उघडला की आपण बातम्या वाचतो. त्यात नैराश्‍यात गेल्याने पतीने पत्नीचा खून केला, मित्राने मित्राला मारले, एखाद्या कुटुंब प्रमुखाने अख्खे कुटुंबच संपविले, आईने मुलीला मारून स्वतःला संपविले असे आणि इतरही काही या बातम्याची नुसती हेडिंग वाचली तरी पुढे काही वाचावे असे वाटतच नाही. इतकी क्रूरता इतकी माणसाला पशू बनविणारी ही वृत्ती एखाद्या व्यक्तीमध्ये कशामुळे निर्माण होते की ज्यामुळे सारी सद्‌सद्विवेक बुद्धी खुंटीला टांगून इतके भयानक कृत्य करायला माणूस तयार होतो.

माणूस मुळात चांगला किंवा वाईट असू शकतो. प्रत्येकाचा स्वभाव, आवडी निवडी भिन्न असू शकतात. पण अघोरी कृत्य करण्यासाठी तयार होणारी मानसिकता ही केवळ आत्यंतिक क्रोध, मत्सर, द्वेषबुद्धी, संशयाने बाधित असलेले विकृत मन आणि कमालीचा एखाद्या व्यक्तीचे नकोसेपण यातून तयार होत असावी. व्यक्तीमध्ये ताण असतात. पण हल्ली या ताण-तणांवांचे स्वरूप फार बदललेले आहे. हे ताण माणसाला पराकोटीची वाईट कृत्ये करावयास भाग पाडतात. परीक्षेचा ताण असह्य झालेली 9वी, 10वीची मुले आपले जीवन संपवितात. मेडिकल, इंजिनिअरिंगचे विषय राहिल्याने नापास झालेली कित्येक हुषार मुले स्वतः ते अपयश पचविता न आल्याने, स्वतःलाच संपवितात. यावेळी या मुला-मुलींच्या पालकांची काय अवस्था होत असेल! का इतका टोकाचा निर्णय घेण्याइतपत त्यांची मानसिक स्थिती बिघडते. या सर्व प्रश्‍नांना उत्तरे असतातच असे नाही. त्या वेळेस तो मनुष्य असा का वागला त्याचे उत्तर द्यायला तो जिवंत असतोच कुठे? पण त्याच्यावर प्रेम करणाऱ्या इतरांना मात्र या प्रश्‍नांची उत्तरे कधीच मिळत नाहीत आणि त्यांचेही पुढचे आयुष्य दुःखातच जाते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पूर्वीच्या काळीही असे एखादे कृत्य आपण वाचत असू परंतु आता मात्र ते नित्य नेमाचे झाले आहे. त्यामुळेच बाप ते वाचून क्षणभर हळहळून जाऊन पुन्हा आपल्या नित्यकर्मात ते विसरण्याचा कोडगेपणा आपल्यातसुद्धा येऊ लागला आहे. सर्वच भावना बोथट व्हायला लागल्या आहेत.

यासाठी काही प्रयत्न करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनेच पुढाकार घ्यायला पाहिजे. कुटुंबापासून सुरुवात करून, व्यक्ती व्यक्तीमधील आपलपणा प्रेम वाढीस लागायला पाहिजे. प्रत्यक्ष “संवाद’ होणे आवश्‍यक आहे. फक्त चांगल्या गोष्टी लोकांना सांगून, मनातले दुःख मनातच ठेवणे नको. उलट आपले दुःख, आपली काही अडचण समोरच्या व्यक्तीला सांगून, आपले मन मोकळे करण्याइतपत विश्‍वासाचे नाते जोपासायला हवे. तरच साऱ्या वाईट भावनांचा निचरा होईल. या भावना जितक्‍या मनात साठत राहतात त्यातूनच पुढे त्याचे विकृत स्वरूप होते. तेव्हा त्यांचा निचरा होणे आवश्‍यकच आहे.

माणसाने माणसासारखे वागावे पशूसारखे नाही. आपल्या भाव-भावना व्यक्त होण्यासाठी त्याला आसपास आधार हवा. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती हव्यात. तरच ताण-तणाव झेपण्याइतपत त्यांची मानसिक तयारी होईल. आणि स्वतःचे किंवा दुसऱ्यालासुद्धा कोणत्याही प्रकारे त्रास देण्याचा त्याचा स्वभाव कमी होईल. प्रेमाने जग जिंकता येते तर माणसे का नाही?

– आरती मोने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)